गुन्हा रद्द होण्यासाठी रश्मी शुक्ला न्यायालयात

संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग प्रकरण

मुंबई,७ जानेवारी/प्रतिनिधीः- बेकायदा फोन टॅपिंगबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यातून मुक्त करण्यात यावे यासाठी भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी रश्मी शुक्ला यांनी येथील महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली आहे.

शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन बेकायदेशीररित्या टॅप केल्याचा गुन्हा शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलिस ठाण्यात दाखल झालेला आहे.

माझ्यावर खटला भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी न घेता आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे त्यामुळे मला गुन्ह्यातून मुक्त करण्यात यावे, अशी शुक्ला यांनी मागणी केली आहे. रश्मी शुक्ला यांच्या या अर्जावर सरकारने आपले म्हणणे सादर करावे, असे दंडाधिकाऱ्यांनी सांगितले असून सुनावणी आता ३१ जानेवारी रोजी ठेवली आहे.

रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या (एसआयडी) आयुक्त असताना राऊत आणि खडसे यांचे कथित फोन टॅप झाले होते. मुंबई पोलिसांनी एप्रिल २०२२ मध्ये शुक्ला यांच्यावर ७०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. सध्या त्या केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर आहेत.

पोलिसांकडील माहितीनुसार रश्मी शुक्ला यांनी संजय राऊत यांचे नाव एस. राहाते, असे बदलले व ते समाजविरोधी तत्व असल्याचा दावा करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी गृह विभागाकडून बेकायदेशीरपणे परवानगी मिळवली. संजय राऊत यांच्या फोन नंबर्सपैकी एक आणि खडसे यांच्या दोन फोन नंबर्सवर नजर ठेवण्यात आली होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे. शुक्ला यांनी खडसे यांचे नाव बदलून खडसने असे ठेवले होते आणि त्यांचे फोन खास कारणांसाठी टॅप करण्याची परवानगी मागितली होती, असे या विषयाशी संबंधित पोलिस अधिकारी म्हणाला. या गोष्टी समोर आल्यामुळे या प्रकरणी बनावट दस्तावेज तयार केल्याची अतिरिक्त कलमे लावण्यात आली आहेत.