जी 20 परिषदेच्या निमित्ताने आयोजित सायकल फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे,७ जानेवारी / प्रतिनिधी :-पुण्यात होणाऱ्या जी20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सायकल क्लब तर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी झालेल्या या सायकल फेरीचे आयोजन जी20 बद्दल नागरिकांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने करण्यात आले होते. 

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (जनरल) रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) डॉक्टर कुणाल खेमनार आणि अतिरिक्त आयुक्त (विशेष) विकास ढाकणे यांनी झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात करून दिली.


सायकल चालवा पर्यावरण राखा, भारत माता की जय, अशा घोषणा देत महापालिका मुख्य भवनापासून रॅलीला प्रारंभ झाला. जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, थोरले बाजीराव रस्ता, शनिवार वाडा आणि पुन्हा महानगरपालिका इमारत अशा मार्गाने ही सायकल फेरी पूर्ण करण्यात आली.


सुमारे अठराशे सायकल चालकांनी यासाठी नोंदणी केली होती.पुणे महापालिकेचे सर्व विभाग प्रमुख देखील या सायकल फेरीत सहभागी झाले होते.