बुद्धिबळाचे समाजाला मोठे योगदान!-ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांचे प्रतिपादन

मुंबई ,​७​ जानेवारी  / प्रतिनिधी :- बुद्धिबळ खेळल्याने मुलांची बौद्धिक क्षमता विकसित होते. ती हुशार होतात. बुद्धिबळामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. त्यामुळे ही मुले फक्त बुद्धिबळ चॅम्पियनच होणार नाहीत, तर भविष्यात समाजातील यशस्वी व्यक्ती म्हणूनही नाव कमावतील. हेच बुद्धिबळाचे समाजाला दिलेले खूप मोठे योगदान आहे, असे मत ग्रँडमास्टर  प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.

गरवारे क्लब हाऊसतर्फे शनिवारी वानखेडे स्टेडियम येथे आयोजित केलेल्या पहिल्या गरवारे क्लब हाऊस (जीसीएच) शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमात ठिपसे बोलत होते.

“तुम्ही विविध क्षेत्रांतील यशस्वी सीईओ, आयपीएस अधिकारी, मुख्याध्यापक, प्राध्यापक, आयआयटीयन्स, राजकीय नेते पाहिलेत तर ते आपल्या आयुष्यात चांगले बुद्धिबळपटू होते. माजी लोकसभाध्यक्ष बलराम जाखड हे विद्यापीठ चॅम्पियन होते, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुखसुद्धा कॉलेज चॅम्पियन होते. अशी अनेक नावे विविध क्षेत्रात आढळतात,” असे ठिपसे यांनी सांगितले.

“२०१९पासून भरतसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बुद्धिबळ संघटना उत्तम कार्य करीत आहे. महाबलीपुरमला झालेली चेस ऑलिम्पियाडही यशस्वीपणे पार पडली. तामिळनाडू राज्य सरकार आणि भारत सरकारने या स्पर्धेसाठी उत्तम पाठबळ दिले. संघटनेचा ‘चेस इन स्कुल’ हा उपक्रमही यशस्वीपणे राबविला जात आहे. आम्ही मुलांना बुद्धिबळ मार्गदर्शक ठरेल असे मार्गदर्शक पुस्तकही संघटनेच्या वेबसाईटवर उपलब्ध केले आहे. अशी खेळाला प्रेरक अनेक पावले आम्ही उचलली आहेत,” असे ठिपसे यावेळी म्हणाले.

१९८५मध्ये मॉस्को येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेची आठवण ठिपसे यांनी सांगितली. ते म्हणाले, “गॅरी कास्पारोवला त्याच्या विश्वविजेतेपदाबाबत विचारले होते. तेव्हा त्याने सांगितले, माझ्या देशात ४५ लाख खेळाडू बुद्धिबळ खेळतात. त्यामुळे त्यापैकी एखादा जगज्जेता होणे स्वाभाविक आहे.’’

‘’शरद पवार हे गेली अनेक वर्षे बुद्धिबळच नव्हे, तर अन्य अनेक क्रीडा संघटनांचे आधारस्तंभ आहेत. ते राज्यातील अनेक क्रीडा प्रकारांचे खंदे पुरस्कर्तेही आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीच्या नावाने स्पर्धा होणे हे अभिमानास्पद आहे. गरवारे क्लब हाऊसने या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या अध्यक्षांचा सन्मानच केला आहे. या एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत सात राज्यांतील विक्रमी संख्येने जवळपास सातशे खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेला देशातील सर्वाधिक रकमेचे बक्षीस देण्यात येणार आहे. अगदी ८, १०,१२वर्षांखालील वयोगटासाठी संयोजकांनी बक्षिसे ठेवली आहेत. यासाठी मी गरवारे क्लब हाऊसचे अभिनंदन करतो,’’ असे ठिपसे यांनी सांगितले.

शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी गरवारे क्लब हाऊसकडे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातून सुमारे सातशे प्रवेशिका दाखल झाल्या आहेत. यापैकी ७० टक्के मुलांचा समावेश आहे. मुंबईच्या बुद्धिबळ इतिहासात सर्वाधिक बुद्धिबळपटूंचा सहभाग असलेली ही महाबुद्धिबळ स्पर्धा असणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील विजेत्याला शरद पवार चषक आणि दोन लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात येईल. याचप्रमाणे अन्य ४५ विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या सहकार्याने आम्ही गेले तीन आठवडे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेत आहोत, अशी माहिती गरवारे क्लब हाऊसचे संचालक आणि बुद्धिबळ समितीचे अध्यक्ष मोहित चतुर्वेदी यांनी दिली.

“आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षेत्रातील गुणवत्ता जोपासण्याची ही संधी आमच्या गरवारे क्लब हाऊसला शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या निमित्ताने मिळत आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. स्पर्धेत मोठ्या संख्येने बुद्धिबळपटूंनी भाग घेतला असला तरी मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि गरवारे क्लबची कार्यकारिणी समिती हे यशस्वीपेणे पेलते आहे. गरवारे क्लब हाऊसची क्रीडा संस्कृती वैभवशाली अशी आहे. मोहित आणि त्याची चमू ही बुद्धिबळ स्पर्धा उत्तम योजना आखून ही स्पर्धा घेत आहे,” असे गरवारे क्लब हाऊसचे उपाध्यक्ष राज पुरोहित यांनी सांगितले.

“क्रीडा उपक्रम आयोजित करण्याचा आमचा उद्देश फक्त फक्त तरुण खेळाडूना घडवणे नव्हे, तर उत्तम व्यक्तिमत्व विकास आणि व्यक्ती घडवणे, हा आहे,” असे गरवारे क्लब हाऊसचे कोषाध्यक्ष मनीष अजमेरा यांनी सांगितले.

“बुद्धिबळ या खेळाला उत्तम चालना मिळावी, या हेतूने हे गरवारे क्लब हाऊसचे पाऊल आहे. चेस ऑलिम्पियाडच्या टॉर्च रिलेचेही आमच्या क्लबने त्यावेळी आयोजन केले होते. काही वर्षांपूर्वी क्लबतर्फे जीसीएच महाराष्ट्र राज्य ज्युनियर खुली बुद्धिबळ स्पर्धासुद्धा यशस्वी आयोजित केली जायची. पहिल्या शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या यशामुळे क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे,” असे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांनी सांगितले.