तुम्हाला वाटते  तर गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्र्यांना अजित पवार यांचे प्रत्युत्तर

मुंबई ,६ जानेवारी  / प्रतिनिधी :- विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार  यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं विधान केल्याने राज्यातील वातावरण सध्या तापलं आहे. अजित पवार यांच्या या विधानावरुन भाजपकडून  टीका केली जात आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा देखील केला होता. छत्रपती संभाजी महाराजांबाबत सभागृहात केलेल्या विधानावर ठाम आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी केलेल्या विधानावर प्रत्युत्तर दिले  आहे. 

मी मांडलेली भूमिका चूकीची आहे हे ठरवणारे  कोण?

“मी माझ्या कामाला आणि लोकांच्या प्रश्नाला महत्त्व देतो. आम्ही आधीपासूनत पुरोगामी विचार मानणारे आहोत. महापुरुषांच्या विचारांना धक्का न लावता पुढे जावं असा आमच्या सर्वांचा प्रयत्न असतो. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून केलेल्या घटना, नियमांचे सर्वांना पालन केले पाहिजे. पण त्यासोबत विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तसेच मी जी भूमिका मांडली ती सगळ्यांनाच पटली पाहिजे असे  काही नाही. पण मी मांडलेली भूमिका चूकीची आहे हे ठरवणारं कोण? मी असा काय गुन्हा केला आहे? जनतेला जी भूमिका पटेल त्याचे ते स्वागत करतील,” असे अजित पवार म्हणाले.

छत्रपतींच्या विचारांसोबत आम्ही द्रोह करणार नाही – अजित पवार

यावेळी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाबाबत अजित पवार यांनी प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे. तुम्हाला जर हा द्रोह वाटतो तर गुन्हा दाखल करा. पण हा गुन्हा नियमांत बसतो का? छत्रपतींच्या विचारांसोबत आम्ही द्रोह करणार नाही,” असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार  यांनी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले “आता योगी महाराज आले आहेत महाराष्ट्रात. ते तिकडून येऊन आपल्या उद्योगवर डल्ला मारत आहेत आणि आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय करत आहेत”.

काल योगी मुंबई दौऱ्यावर आले होते त्यांनी उद्योगपतींची आणि काही अभिनेत्यांशी चर्चा केली. तर अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला प्रसाद लाड आणि गोपीचंद पडळकरांवर टिका करताना ते म्हणाले की, “एक तर पठ्ठ्या म्हटला शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. अन् दुसरा म्हटला की शिवाजी महाराजांचा कोथळा काढला.

त्यानंतर त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली ते म्हणाले “आपले पालकमंत्री म्हणत होते की भीक मागीतली, महात्मा फुले त्या काळात सक्षम होते आणि तुम्ही म्हणता भीक मागत होते आम्हाला राग नाही येणार” असं म्हणत अजित पवारांनी सरकारवर चौफेर टीका केली.

काय म्हणाले होते फडणवीस?

“छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणण्यास कोणाचीच हरकत नाही. ते स्वराज्य रक्षक आहेतच. छत्रपती संभाजी महाराज हे देव, देश आणि धर्मासाठी लढले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात हिंदू उरलेच नसते. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच. त्यांना धर्मवीर न म्हणणं हा द्रोह आहे”, असे देवेंद्र फडणवीस गुरुवारी म्हणाले.