उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का:नाशिक व परभणीतील शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या गटात

मुंबई, ६ जानेवारी/प्रतिनिधीः- शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जवळपास ९० कार्यकर्ते शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (बाळासाहेबांची शिवसेना) येथे आल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.नाशिकमध्ये यापूर्वीदेखील संजय राऊतांच्या दौऱ्यानंतर ठाकरेंना धक्का बसला होता.

या कार्यकर्त्यांमध्ये गट विभागापासून ते जिल्हा स्तरापर्यंते नेते समाविष्ट आहेत. यात नाशिकमधील ६० तर परभणीतील ३० जण आहेत. ३० जणांमध्ये स्थानिक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस व इतरांचा समावेश आहे. या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आगामी दिवसांत अनेक जण बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या आदर्शांनुसार काम करणाऱ्या शिवसेनेत (बाळासाहेबांची शिवसेना) दाखल होणार आहेत. शिवसेना (बाळासाहेबांची) आणि भाजप यांचे सरकार राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून खूप चांगले काम करीत आहे. त्यामुळेच खूप लोक पक्षाशी जोडले गेले असून आम्ही प्रत्येकाला सोबत घेऊन जात असल्यामुळे आगामी दिवसांत ते आम्हाला पाठिंबा देतील, असेही शिंदे म्हणाले.

आम्ही खूप वेगाने आणि शांतपणे काम करीत असताना काही लोक काहीही कामे न करता ती केल्याचे मोठमोठे दावे करीत आहेत. याच कारणामुळे राज्यातील जनता सरकारला पाठिंबा देत आहेत, असेही शिंदे म्हणाले. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यात विकास झाला नाही, असे म्हटले होते. जे लोक शिवसेना सोडून जात आहेत ते काही महत्वाचे नसून पक्ष नाशिक आणि परभणीत भक्कम आहे, असेही राऊत म्हणाले होते. यावर बोलताना शिंदे यांनी वरील भाष्य केले.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कार्यकर्ते आणि नेते जर अशारितीने पक्ष सोडून जात असतील तर पक्ष नेतृत्वाने या घडामोडींची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या प्रारंभी नाशिकमध्ये जाहीरसभा घेणार असताना ही अनपेक्षित घटना घडली आहे. या सभेची तयारी सध्या संजय राऊत करीत आहेत.

गेली अनेक दिवस नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ही गळती थांबवत डॅमेज कंट्रोलसाठी राऊत नाशिकमध्ये मैदान तयार करण्यासाठी येत आहेत. नाशिकच्या संपर्क प्रमुखांसह, माजी आमदार, माजी १२ नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी मागील १५ दिवसात पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. तर आज ५० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ आता शिंदे गटाचा ओळखला जात आहे. त्यात आता शहरातील ठाकरे गटातील काही पदाधिकारी हे शिंदे गटामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे संजय राऊत हे नाशिकमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.