वैजापूर तालुक्यात शेतकरी योजनेच्या शिधापत्रिका धारकांना नऊ महिन्यापासून धान्य नाही ; तीन महिन्यापासून तांदळाचा पुरवठाही बंद

शिधापत्रिकाधारकांतून होतेय ओरड

वैजापूर ,​५​ जानेवारी  / प्रतिनिधी :- शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या  सार्वजनिक वितरण प्रणालीतर्गंत एपीएल शेतकरी योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना वंचित राहवे लागत आहे. राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यासह अन्य 13 अशा एकूण 14 जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचा अन्नपुरवठा शासनाने बंद केला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून गहू तर तीन महिन्यांपासून तांदळाचा शिधा त्यांना मिळालाच नाही. त्यामुळे तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांमधून ओरड सुरू आहे. 

रेशनकार्ड

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीतर्गंत एपीएल शेतकरी योजनाच्या शिधापत्रिकाधारकांना गहू व तांदळाचे वाटप करण्यात येते. शिधापत्रिकाधारकांना  गहू व तांदूळ अनुक्रमे दोन व तीन रुपये किलो दराने दरडोई पाच किलो वितरित केले जातात. परंतु एप्रिल 2022 पासून ते आजतागायत एपीएल शेतकरी योजनाच्या शिधापत्रिकाधारकांना गव्हाचे वितरण करण्यात आले नाही. याशिवाय ऑक्टोबर 2022 पासून म्हणजेच तीन महिन्यांपासून तांदळाचेही वितरण करण्यात आले नाही. विशेष म्हणजे अन्नसुक्षा व अंत्योदय योजनेतर्गंत असलेल्या शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा नियमित सुरू आहे. तालुक्यात एपीएल शेतकरी योजनेतर्गंत 6हजार 266 शिधापत्रिकाधारक असून अन्नधान्य वितरित न झाल्याने त्यांच्याकडून ओरड सुरू आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सहसचिवांशी वारंवार पत्रव्यवहार केला. परंतू त्यानंतरही तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी धान्याचा कोटा प्राप्त झाला नाही. धान्याचा कोटा मिळत नसल्यामुळे गावपातळीवर शिधापत्रिकाधारक व स्वस्तधान्य दुकानदारांमध्ये हुज्जती सुरू झाल्या आहेत. स्वस्तधान्य दुकानदार शासनाकडूनच कोटा प्राप्त झाला नसल्याचे सांगून मेटाकुटीला आले .परंतु शिधापत्रिकाधारक त्यांचे काहीएक ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारक थेट तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रारी करीत आहेत. संबंधित अधिकारी त्यांना शासनाकडूनच धान्याचा कोटा प्राप्त न झाल्याने दुकानदारांमार्फत वितरण बंद असल्याचे सांगितल्यानंतर त्यांची खात्री पटत आहेत. त्यामुळे या शिधापत्रिकाधारकांचा अचानक बंद करण्यात आलेला धान्य पुरवठा कधी सुरळीत करण्यात येतो. याची खात्री पुरवठा विभागाचे अधिकारीही देत नसल्याने धान्य वितरणाचा प्रश्न सध्यातरी अनिश्चिततेच्या भोवऱ्यात आहे.  दरम्यान सार्वजनिक वितरण प्रणालीतर्गंत एपीएल शेतकरी योजनेच्या शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद करण्यात आल्याने विविध राजकीय पक्षांसह संघटना आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. 

…तर आता मोफत धान्याचे वितरण

दरम्यान शासनाने एकीकडे एपीएल शेतकरी योजनेच्या शिधापत्रिकाधारकांचा अन्नपुरवठा गेल्या आठ महिन्यांपासून बंद केला असला तरी दुसरीकडे अन्नसुक्षा व अंत्योदय योजनेतर्गंत असलेल्या शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने नूतन वर्षाची भेट दिली आहे. येत्या जानेवारी महिन्यापासून या दोन्हीही योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना गहू व तांदळाचे मोफत वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यापूर्वी या योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना गहू दोन व तांदूळ तीन रुपये प्रतिकिलो दराने वितरित केला जात होता. 

शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीतर्गंत तालुक्यातील एपीएल शेतकरी योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना एप्रिल पासून आजतागायत गव्हाचे व ऑक्टोबरपासून ते आजतागायत तांदळाचे वितरण करण्यात आले नाही. वरिष्ठ पातळीवरूनच हा धान्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. धान्य पुरवठा  नेमका कशामुळे बंद करण्यात आला. याचे नेमके कारण मला सांगता येणार नाही असे वैजापूरचे पुरवठा निरीक्षक कैलास बहुरे यांनी सांगितले.