अजित पवारांचे समर्थन करणाऱ्या सामनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

मुंबई, ४ जानेवारी  / प्रतिनिधी :- छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे समर्थन सामनाने केले. मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्या सामनात हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही. अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पालघर येथे केली.पालघर जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक व विक्रांत पाटील उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत, असे अजित पवार म्हणाले तर औरंगजेब क्रूर नव्हता असे राष्ट्रवादी काँग्रसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. अशा नेत्यांची बाजू सामनाने घेतली. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामना वृत्तपत्र सुरू केले त्यावेळी त्याचे नाव भगव्या अक्षरात लिहिले आणि त्याचे अंतरग आणि बाह्यरंग भगवे होते. पण आता उद्धव ठाकरे संपादक झाल्यावर सामनाचे अंतरंग आणि बाह्यरंग हिरवे झाले आहे. मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्या सामनात बाळासाहेबांचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेणाऱ्यांना महाराष्ट्र दारात उभे करणार नाही.

        छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शरद पवार यांनी वेगळ्या रितीने मांडला. आता अजित पवार हे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर असल्याचे मान्य करत नाहीत. मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले पण त्यांनी धर्म सोडला नाही. तरीही त्यांना धर्मवीर म्हणू नका असे म्हणता. तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.

        त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य लोकांसाठी अनेक योजना अंमलात आणल्या. परंतु, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात मोदी सरकारच्या योजनांच्या राज्यातील अंमलबजावणीत अडथळे आणले. प्रधानमंत्री आवास योजनेत निधी वापराचे प्रमाणपत्र महाविकास आघाडी सरकारने दिले नाही व परिणामी लाभार्थींचे अडीच हजार कोटींचे अनुदान थांबले. आता शिंदे फडणवीस सरकारने मोदी सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजनांच्या अंमलबजावणीला गती दिली आहे. मोदीजींच्या योजना घरोघर पोहोचल्या का यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही निरीक्षण करणार आहेत.