कोविडपश्चात गुंतागुंतीवर अभ्यासपूर्ण चर्चा

नागपूर ,४ जानेवारी  / प्रतिनिधी :- कोविड 19 च्या महामारीनंतर विविध प्रकारे शारिरीक, मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून अशा सर्व घटकांबाबत आजच्या ‘कोविड 19 संसर्गाचे दीर्घकालीन परिणाम’, या विषयावरील परिसंवादात अभ्यासपूर्ण चर्चा झाली.

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या गणित विभागाच्या श्रीनिवास रामानुजन सभागृहात हे चर्चासत्र पार पडले. राकेश अग्रवाल अध्यक्षस्थानी होते. या चर्चासत्रात डॉ. देवेंद्र अग्रवाल यांनी ‘कोविड पश्चात उद्भवणाऱ्या वैद्यकीय जटिलतेविषयी आढावा’, डॉ. तन्वी सिंघल यांनी ‘कोविडनंतर उद्भवणारे दुय्यम संसर्ग’, डॉ. विद्यालक्ष्मी सेल्वराज यांनी ‘कोविड पश्चात मानसिक आरोग्य’ तर डॉ. विनीत अग्रवाल यांनी ‘कोविड पश्चात हृदयक्रियांमधील जटिलता’, याविषयी आपले शोधनिबंध सादर केले.

डॉ. देवेंद्र अग्रवाल म्हणाले की, 12 आठवड्यांपेक्षा अधिक काळ कोविड संसर्ग राहणे वा त्यावरील उपचार सुरु राहणे हे कोविड पश्चात गुंतागुंतींचे प्रमुख कारण आहे.  अशा रुग्णांमध्ये पेशींची हानी होणे, चव, गंध ओळखणाऱ्या संवेदनांची कमी होणे, पेशींना सूज येणे, मधुमेहाशी निगडीत गुंतांगुंत वाढणे इ. 62 प्रकारच्या गुंतागुंत नोंदविण्यात आल्या आहेत. या शिवाय केस गळणे, वारंवार थकवा येणे, आवाजात बदल होणे, भीती, नैराश्य अशा लक्षणांमध्येही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

डॉ. तनु सिंघल यांनी सादर केलेल्या शोधनिबंधात दुय्यम संसर्गांविषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यांनी सांगितले की, कोविड उपचारादरम्यान अधिक काळ अतिदक्षता विभागात दाखल असणे, कृत्रिम श्वसनावर अवलंबून असणे, त्यासाठी वापरलेला ऑक्सिजन सदोष असणे, अस्वच्छता इ. कारणांमुळे हे संसर्ग विकसित होतात. त्यात काळी बुरशी सारखा संसर्ग, न्युमोनिआ, मुत्रमार्गातील संसर्ग, रक्तमार्गातील संसर्ग इ. संसर्गांचा समावेश होतो. उपचारादरम्यान असे लक्षात येते की, रुग्णाला जरी कोविड संसर्ग झाला असला तरी प्रत्यक्षात त्याआडून अन्य संसर्ग विकसित होतात आणि रुग्ण अत्यवस्थ होतो.

डॉ.विजयलक्ष्मी सेल्वराज यांनी आपल्या शोधनिबंधात मांडले की, कोविड आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अभुतपूर्व परिस्थिती उदा.लॉकडाऊन, जवळच्या नातेवाईकांचे मृत्यू, आजारपण, संसर्गाच्या भीतीने त्यांची सुश्रुषा करता न येणे तसेच अन्य कारणांमुळे सामाजिक वातावरणात बदल घडले. या परिस्थितीमुळे लोकांना एकलकोंडेपणा,भय अशा मानसिक घटनांना सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम म्हणून लोकांना विविध मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले. अनेक लोक व्यसनांना बळी पडले. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. उपचारानंतर बरे झाल्यानंतरही नैराश्य, तणाव, भीती, निद्रानाश, लैंगिक समस्या अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

डॉ. विनीत अग्रवाल यांनी ‘कोविड पश्चात हृदयक्रियांमधील जटिलता’, या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला. या संशोधनासाठी त्यांनी 1,53,000 रुग्णांचा अभ्यास केला. कोविडच्या अधिक काळ उपचारानंतर अशा रुग्णांना हृदयक्रियेत विविध अनियमितता होत असल्याचे निदर्शनास आले. त्यात हृदयविकाराचा झटका येण्यापर्यंत बाबी निदर्शनास आले असल्याची मांडणी केली आहे.त्यांच्या वतीने डॉ. देवेंद्र अग्रवाल यांनी सादरीकरण केले.