अमृत काळात भारत ठरणार आधुनिक विज्ञानाची सर्वात मोठी प्रयोगशाळा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

१०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन

नागपूर ,३ जानेवारी  / प्रतिनिधी :- भारतीय विज्ञान काँग्रेसची ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’, ही मध्यवर्ती संकल्पना औचित्यपूर्ण असून  महिलांनी सहभाग दिल्याने देशात विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाला नवी गती प्राप्त झाली आहे. अमृतकाळात भारत देश आधुनिक विज्ञानाची जगातील सर्वात मोठी प्रयोगशाळा ठरेल, असा आत्मविश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला.

येथे १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आवारात हा सोहळा पार पडला. येत्या ७ जानेवारीपर्यंत येथे विविध विज्ञानविषयक चर्चासत्रे व सादरीकरण  होणार आहे. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे  उपस्थिती होती. तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती विजयलक्ष्मी सक्सेना, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.

वैज्ञानिक संशोधनाला देशसेवेच्या भावनेची जोड आवश्यक

आपल्या संबोधनात प्रधानमंत्री मोदी म्हणाले की,  येत्या २५ वर्षात भारत कोठे असेल याचे अनुमान करण्यात विज्ञानाची भूमिका मोलाची आहे. ज्यावेळी वैज्ञानिक संशोधनाला देशसेवेच्या भावनेची जोड मिळते त्यावेळी मिळणारे परिणाम अभूतपूर्व असतात. निरीक्षण हा विज्ञानाचा पाया आहे. निरीक्षणाच्या जोडीला केले जाणारे प्रयोग त्यातून मिळणारी तथ्ये आणि त्यांचे विश्लेषण हे महत्त्वाचे असते. मिळालेल्या माहितीचे पृथक्करण करणे हे वैज्ञानिकांसाठी महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने सध्याच्या काळात भारताकडे  मोठ्या प्रमाणावर डाटा आणि तंत्रज्ञ उपलब्ध आहेत. या नव्या क्षेत्रात भरारी घेण्यास भरपूर वाव आहे. पृथक्करण केलेल्या माहितीचे ज्ञानात रुपांतर करणे आणि  ज्ञानातून विज्ञान संशोधन करणे हे परस्परांना मदत करणारे घटक ठरु शकतात.

वैज्ञानिक दृष्टीला चालना दिल्याचे चांगले परिणाम

प्रधानमंत्री म्हणाले की, वैज्ञानिक दृष्टीला चालना दिल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. आपण सध्या विकसित देशांच्या ग्लोबल इनोव्हेशन सूचित ४० व्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. पीएचडी  करण्याबाबतही आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत. स्टार्टअप देशांच्या इकोसिस्टिम सूचित आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत.

महिलांच्या सहभागामुळे विज्ञान तंत्रज्ञानाला गती

मध्यवर्ती संकल्पनेबाबत बोलताना प्रधानमंत्री म्हणाले की, विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने शाश्वत विकास आणि महिला सक्षमीकरण  हे शब्द जोडले आहेत. हे खरेच आहे की, महिलांच्या सहभागामुळे विज्ञान तंत्रज्ञानाला नवी गती प्राप्त झाली आहे. महिलांचा सर्वच क्षेत्रातील सहभाग  हा वाखाणण्यासारखा आहे. येत्या जी २० परिषदेचे यजमानपद भूषवित असतानाही आपण  महिलांच्या पुढाकारातून विकास हे सूत्र ठरविले आहे. महिलांनी विज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात असाधारण कार्य केले आहे. इतकेच नव्हे तर स्टार्टअप आणि मुद्रा योजनेसारख्या लहान व्यवसायांना चालना देणाऱ्या योजनेत महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला आहे. ज्यावेळी महिलांना चालना मिळत असते त्यावेळी तो समाजही प्रगत होत असतो.

मानवाचे आयुष्य सुखद करणे हेच विज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट

या काँग्रेसच्या निमित्ताने जमलेल्या वैज्ञानिकांना आवाहन करताना प्रधानमंत्री म्हणाले की, मानवाचे आयुष्य सुखद करणे, सर्व गरजांची पूर्तता करणे हे आपल्या ज्ञानाचे उद्दिष्ट असायला हवे. प्रयोगशाळा ते जमीन, संशोधन ते वास्तविक जीवन, प्रयोग ते अनुभूती हा असा हा ज्ञानाचा प्रवास असायला हवा. ही बाब युवकांना अधिक प्रोत्साहित करते. युवकांना या क्षेत्रात पुढे नेण्यासाठी संस्थागत रचनेच्या मजबुतीकरणाची आवश्यकता आहे.  टॅलेंट हंट आणि हॅकेथॉनच्या आयोजनातून आपण विज्ञानवादी विचार करणाऱ्या युवकांच्या प्रतिभेचा शोध घेऊ शकतो. अशाच संस्थागत रचना मजबुतीकरणातून देशाने क्रीडा क्षेत्रात प्रगती सुरु केली आहे.यात गुरु शिष्य या प्राचीन भारतीय परंपरेचेही योगदान महत्त्वाचे होते. त्याच पद्धतीने विज्ञानाच्या क्षेत्रातही कार्य करणे शक्य होईल व यश संपादन करता येईल.

प्रधानमंत्र्यांनी सुचविले विज्ञान संशोधनाचे विषय

सहभागी वैज्ञानिकांशी  संवाद साधताना प्रधानमंत्री म्हणाले की, जगातील १७ ते १८ टक्के लोकसंख्या एकट्या भारतात राहते. विज्ञान संशोधनातून होणारे लाभ हे इतक्या लोकसंख्येपर्यंत पोहोचतील. त्यादृष्टीने आपण ऊर्जा क्षेत्रात वाढणाऱ्या गरजा लक्षात घेता संशोधन कार्य करायला हवे. हायड्रोजन एनर्जीच्या अनेक शक्यतांवर आधारित देश नॅशनल हायड्रोजन मिशन वर कार्य करीत आहे. त्याला यशस्वी करण्यासाठी आवश्यक असणारे इलेक्ट्रोलायझर्स हे घटक बनविण्यासाठी आपण देशात चालना द्यायला हवी. त्यादिशेने आपले संशोधन असायला हवे.  या क्षेत्रात वैज्ञानिक आणि उद्योजक मिळून काम करु शकतात.

मानवी समूहांवर वेगवेगळ्या आजारांचे आक्रमण होत असते.  म्हणून आपण नव्या नव्या लसी तयार करण्यावर भर देण्यासाठी संशोधन केले पाहिजे. भूकंप-पूर या सारख्या नैसर्गिक आपत्तींशी सामना करण्यासाठी आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहकार्यामुळे आधीपासूनच सज्ज राहू शकतो, त्याचप्रमाणे आपण साथीच्या आजारांचेही एकात्मिक  निरीक्षणाद्वारे अनुमान करुन त्यासाठी सज्ज राहू शकतो.  यासाठी विविध मंत्रालयांना एकत्र काम करावे लागेल. संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. यानिमित्ताने भारताला तृणधान्य आणि त्यांच्या वापराविषयी आपण अधिक समृद्ध बनवू शकतो. जीवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून तृणधान्यांच्या कापणी पश्चात होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण मिळवू शकतो.

कचरा निर्मूलन या क्षेत्रातही काम करण्यास मोठा वाव आहे. घन कचरा, इ- कचरा, बायोमेडिकल कचरा, कृषीतून होणारा कचरा यासारख्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठीही खूप कार्य करता येईल.

अंतरिक्ष विज्ञानात भारताने विलक्षण प्रगती केली आहे. स्वस्त उपग्रह प्रक्षेपण यानाच्या सेवा आपण देऊ लागलो आहोत. त्याचा इतर देशही आपल्या सेवांचा लाभ घेऊ लागले आहेत. यातही खाजगी उद्योग, नवे स्टार्टअप्स आपला सहभाग घेऊ शकतात.

यासोबतच क्वांटम क्षेत्रात आपण पुढाकार घ्यायला हवा. क्वांटम संगणक, भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, संचार शास्त्र, संवेदन शास्त्र, क्रीप्टोग्राफी अशा विविध क्षेत्रात आपण भरपूर संधी मिळवू शकतो.  नव्या संशोधकांनी या क्षेत्रात प्राविण्य मिळवावे आणि या क्षेत्रात नेतृत्व करावे.

सेमिकन्डकटर चिप्स बनविण्याच्या क्षेत्रातही आपल्याला पुष्टी देण्याची आवश्यकता आहे.

या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या माध्यमातून विविध रचनात्मक मुद्द्यांवर विचार विमर्श होऊन विकासाचा रोड मॅप तयार होईल. अमृत काळात भारत आधुनिक विज्ञानाची सर्वात मोठी प्रयोगशाळा बनेल, असा आत्मविश्वास प्रधानमंत्र्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.

भारतात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता- राज्यपाल

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, भारतात वैज्ञानिक परंपरा प्राचीन आहे. त्याकाळातही भारत जगाच्या पुढे होता. आधुनिक काळातही भारतात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असून त्याचा प्रमुख आधार विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती हाच आहे. यानिमित्ताने विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची प्रगती व्हावी. त्यात महिलांचे मोठे योगदान आहे. विश्वाचे अध्यात्मिक नेतृत्व भूषविणा-या भारताकडे एकविसाव्या शतकातील जगाचे नेतृत्व असेल हा अशावाद खरा ठरत आहे. असे मत श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केले.

कृषी अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विज्ञानाला चालना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलन, जाती भेद निर्मूलन क्षेत्रात कार्य केले. ग्रामविकासाचे कार्य करताना विवेकवादी विचारांचा प्रचार केला. त्यांच्या नावाच्या विद्यापीठात ही काँग्रेस होणे हे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे आज सावित्रीबाई फुले यांचीही जयंती आहे. ह्या काँग्रेसचे उद्दिष्ट महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान असे आहे.  भारतीय महिला वैज्ञानिकांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात  विज्ञान तंत्रज्ञानात देशाने प्रगती केली आहे. त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे.  येथे बाल विज्ञान काँग्रेसचेही आयोजन केले आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना मिळेल. महाराष्ट्रातील मनुष्यबळ हे सर्वोत्कृष्ट मनुष्यबळ आहे. विज्ञानाला प्रोत्साहन देतांना त्यात कृषी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे हा त्यामागील उद्देश आहे. कृषी अर्थव्यवस्था बळकट करणे हा प्रयत्न आहे. देशाच्या विकासात वैज्ञानिक प्रगतीचे महत्त्व असाधारण आहे.  देशाने औषधनिर्मिती आणि हवामान शास्त्र यात प्रगती साधली असून त्याबाबत जगात लौकिक मिळविला आहे. त्यातून देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत झाली आहे.  

आर्थिक महासत्ता बनण्याचा आधार विज्ञान- नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, विज्ञानाचे दोन उद्दिष्ट असावेत, आत्मनिर्भर भारत आणि अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण. देशाचे सकल घरेलू उत्पादनात सेवा क्षेत्राचे योगदान ५२ ते ५४ टक्के आहे. उत्पादन क्षेत्राचे योगदान २२ ते २४ टक्के, कृषी क्षेत्राचे योगदान१२ ते १४ टक्के. देशाची ६५ टक्के लोकसंख्या ही खेड्यात राहते.  त्या लोकांच्या शाश्वत विकासासाठी विज्ञानाने कार्य करावे. जल-जंगल- जमीन या संसाधनांच्या विकासावर आधारीत विज्ञान संशोधन असावे. मिळालेल्या ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करा.  कोणतीही वस्तू आणि कोणतीही व्यक्ती ही निरुपयोगी नसते.निर्यातीत वाढ केल्यासच आपण आर्थिक महासत्ता बनू शकतो.  त्यात विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे मोलाचे योगदान असू शकते.  देशात अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सची बनविण्याचे प्रधानमंत्र्यांचे स्वप्न साकारण्याचा आधार विज्ञानाची प्रगती असू शकेल.

विज्ञानाला चालना देऊन आदर्श समाजाची जडणघडण- डॉ. जितेंद्र सिंह

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात देशाने विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. याचे कारण विज्ञानाला चालना व वैज्ञानिकांना मिळत असलेली सन्मानाची वागणूक होय. देशात आज ८० हजारहून अधिक स्टार्टअप झाले आहेत. समुद्रतळातील शोध घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी डीप ओशियन मिशनला चालना दिली. अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रालाही त्यांनी चालना दिली. त्यात खाजगी क्षेत्राला सहभागी होण्याची संधी दिली. सद्यस्थितीतही पर्यावरण, ग्रीन एनर्जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना देऊन जगासाठी एक आदर्श समाज आपण घडवित आहोत.

विज्ञानामुळे होईल संसाधनांचे संरक्षण व प्रगती- उपमुख्यमंत्री फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या या भारतीय विज्ञान काँग्रेसची मध्यवर्ती संकल्पना  ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’, ही आहे. आज महिला सक्षमीकरणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ताकद हीच लिंगसमानता साधू शकते. जलवायु परिवर्तन, पर्यावरणावरील संकट यासारख्या महत्त्वाच्या समस्यांबाबत विज्ञान तंत्रज्ञान हेच उपाय शोधू शकते. संसाधनांचा कमित कमी ऱ्हास करुन प्रगती साधण्यासाठी विज्ञानच योगदान देऊ शकते. येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण कसे पर्यावरण सोडून जाणार आहोत. याबाबत उपाययोजना शोधणे हे कार्य विज्ञान तंत्रज्ञानातील विकासानेच होऊ शकते.  कोरोनावर लस तयार करुन आपण देशातील व देशाबाहेरील अनेकांचे जीवन सुरक्षित करण्यात योगदान दिले आहे, हे विज्ञानामुळेच शक्य झाले. अशा विविध संकल्पनांचा विकास या काँग्रेसमध्ये होवो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी सक्सेना यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पोस्ट तिकीटाचे व स्मरणिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन कल्पना पांडे यांनी तर महासचिव एस. रामाकृष्ण यांनी आभार मानले.