सामान्य नागरिकांसाठीही खुले असणार इंडियन सायन्स काँग्रेस; आपल्या पाल्यासह अवश्य भेट देण्याचे आवाहन

नागपूर ,३ जानेवारी  / प्रतिनिधी :- विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कुंभमेळा असणारे इंडियन सायन्स काँग्रेस म्हणजे विद्यापीठाच्या कोप-याकोप-यामध्ये ज्ञानाचा खजिना साठवलेले प्रदर्शन आहे. ऐकायचे असेल तर नवल, बघायचे असेल तर नवल आणि अनुभवयाचे असेल तर विज्ञानाची अनुभूती असे वातावरण या ठिकाणी आहे. सामान्य नागरिकांसाठी  ही परिषद खुली आहे.

विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरामध्ये अमरावती रोडवरून या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी प्रयोजन आहे. उजव्या बाजुला नोंदणी करण्याचे मोठे डोम आहे. या ठिकाणी आपली नोंदणी करता येते. तथापि नोंदणी न करता देखील या ठिकाणी असणा-या विज्ञान प्रदर्शनीला भेट देता येते. या विज्ञान प्रदर्शनीत एकूण ए ते एफ असे सहा हॅाल असणार आहेत. हॅाल ए मध्ये आयआयटी मद्रास,  इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी, सेंट्रल ग्राऊंड वॅाटर बोर्ड, कौन्सिल आफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च आदी स्टॅाल असणार आहेत. यासोबतच नागपुरातील अनेक महाविद्यालये आणि शासकीय संस्थांचे स्टॅाल या हॅालमध्ये असणार आहेत.

हॅाल बी मध्ये केंद्र शासनाच्या विविध संस्थांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.  यात झुलॅाजिकल सर्वे ऑफ इंडिया, रजिस्टार जनरल आफ इंडिया, व्हीएनआयटी, ब्युरो आफ इंडियन स्टँडर्ड, इंडियन  इन्स्टिट्यूड आफ ॲस्ट्रोफिजिक्स, इंडियन कौन्सिल फाॅर मेडिकल रिसर्च आदी संस्थांचा समावेश असेल.

हॅाल सी, डी आणि ई हे हॅालमध्ये देखील  विज्ञान विषयावर आधारित शासकीय तसेच खाजगी  संस्थांचे स्टॅाल असणार आहेत.  अत्यंत माहितीपूर्ण व आकर्षक असा हॅाल हा डीआरडीओ या संरक्षण संस्थेचा असणार आहे. यात डीआरडीओच्या छत्राखाली येणा-या विविध निर्मिती संस्थांचे स्टॅाल असणार आहेत.  अत्यंत वैविध्यपूर्ण असणा-या या हॅालमध्ये डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी,  सॅालिड  स्टेट फिजिक्स लेबॅारेटरी,  डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी अशा अनेक माहिती नसलेल्या संस्थांची माहिती देण्यात येणार आहे.

स्टॅालच्या बाहेर ऑलिम्पिकच्या धर्तीवर विज्ञानविषयक ज्योत तेवत असणार आहेत. त्याबाजुला स्पेस ऑन व्हिल्स ही गाडी असणार आहे. यात इस्त्रोची माहिती  देण्यात येणार आहे.

ख-या अर्थाने विविधांगी विज्ञान विषयक विविध संस्था, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे हे विज्ञान प्रदर्शन असणार आहे. यासोबतच विविध प्लेनरी सत्रांचे आयोजन करण्यात आले आहेत. या विज्ञानविषयक चर्चा करण्यात येणार आहे.  या विज्ञान परिषदेला अवश्य भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.