येत्या दशकात विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशाची घोडदौड; महिलांच्या सहभागाने विज्ञानाला आघाडीवर नेण्याचा विश्वास

नागपूर ,३ जानेवारी  / प्रतिनिधी :- विज्ञान व तंत्रज्ञानाचे सहाय्य व महिलांचा सहभाग घेऊन येत्या दशकात देशाला जागतिकस्तरावर उच्चस्थानी नेण्याचा निर्धार राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या पहिल्या परिसंवादात सहभागी वैज्ञानिकांनी व्यक्त केला.       

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित 108 व्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत ‘विज्ञान व तंत्रज्ञान आव्हाने व संधी’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.  देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय सुद, केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ.एम.रविचंद्रन, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. अलका शर्मा, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.चंद्रशेखर आणि डॉ. कलायशेल्वी यांनी त्यात सहभाग घेतला.

प्रा. सुद म्हणाले की, देशाने जागतिक संशोधन निर्देशांकात 81 व्या स्थानावरुन 40 वे स्थान मिळविले आहे.देशाला संशोधन क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे. स्टार्टअप क्षेत्रात महिलांचा सहभाग आणि विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून 2025 पर्यंतचे उद्ष्ट्यि ठेवून प्रगती साधण्यासाठी  प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. एम.रविचंद्रन यांनी समुद्र संपत्ती आधारीत अर्थव्यवस्था अर्थात ब्लू इकोनॉमी विषयातील संधी व आव्हाने यावर प्रकाश टाकला. एकूण भूभागाच्या 72 टक्के भाग व्यापणाऱ्या जलसंपत्तीचा केवळ 5 टक्केच उपयोग होतो. या क्षेत्रातील बलस्थानांचा पुरेपूर वापर होण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानावर भर द्यावा लागेल. युनो संघटनेने जागतिकस्तरावर 2030 पर्यंत समुद्र संपत्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचे ध्येय ठेवले आहे. भारतानेही या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली असून समुद्री संपत्तीचा वापर करतांना पर्यावरणाला हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ.अलका शर्मा यांनी सांगितले की, जैवइंधनाचा वापर वाढविण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल. कार्बन आधारीत इंधनांवर चालणाऱ्या वाहनांची आयात थांबवण्यासाठी उर्जा व जैवतंत्रज्ञाधारीत इंधनाचा वापर व्हावा.विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांच्या सहभागासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची निकडही त्यांनी मांडली.

डॉ.चंद्रशेखर यांनी सांगितले की, शाश्वत विकासाची संकल्पना व्यापक असून त्यासाठी संशोधन कार्य ग्रामीण भागापासून जागतिकस्तरावर पोहोचवावे लागेल. कृषी क्षेत्रात विज्ञानाचा उपयोग होवून शेतकऱ्यांना रास्तदरात गुणात्मक शेती निविष्ठा उपब्धतेसाठी प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. कलायशेल्वी म्हणाल्या की,  विज्ञान -तंत्रज्ञानाला संशोधन शिक्षक-विद्यार्थ्यांपर्यंत पोचविणे आवश्यक आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहय्याने प्रगती साधण्यासाठी महिलांच्या सहभागासह राबवावयाच्या सप्तसूत्रीची मांडणी त्यांनी केली.

प्रा. अजय सूद यांना आशुतोष मुखर्जी पुरस्कार प्रदान

या परिसंवादाच्या समारोपानंतर देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय सूद यांना  आशुतोष मुखर्जी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी सक्सेना यांच्या हस्ते विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.