पिंपरी-चिंचवडचे आमदार भाजपचे लक्ष्मण जगताप यांचे निधन

पिंपरी -चिंचवड,३ जानेवारी /प्रतिनिधी :- भाजपचे  पिंपरी चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांची आज प्राणज्योत मालवली. गेले अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाची लढा देत होते. पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या जाण्याने पुण्यातील राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. आज सकाळी त्यांनी ५९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

तडफदार नेतृत्व काळाने हिरावले-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मुंबई :- “नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, तसेच दिवंगत जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी-चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत असत. लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. पण नियतीला हे मान्य नसावे आणि आमदार जगताप यांना काळाने हिरावून नेले. हा त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे राजकारण-समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- “आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नांची जाण आणि माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ माझ्या पक्षाचेच नाही तर माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे, मी एक चांगला मित्र गमावला आहे. राजकारण आणि समाजकारणात ठाम भूमिका घेणारा नेता आपल्यातून निघून गेला”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी – चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान कायम लक्षात राहील. मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी काम केले. वाढत्या शहरीकरणात वंचित व उपेक्षित घटकांच्या हिताला बाधा न पोहोचता विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते. आपल्या आजारपणातही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान करून राज्याचा आवाज संसदेत वाढला पाहिजे, यासाठी आग्रह धरला. मध्यंतरी प्रकृती सुधारत असताना ते आपल्यात पुन्हा परतणार, असा ठाम विश्वास होता. पण आज ही वाईट बातमी आली. या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत”.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.

स्वत:च्या कुटुंबासाठी जगत असताना दुसऱ्याचे दु:ख आपले मानून जगणारे खूप कमी असतात. लक्ष्मण जगताप हे त्यापैकी एक होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री म्हणाले, लक्ष्णम जगताप यांनी लोकांसाठी काम केले. ते अतिशय लोकप्रिय आमदार होते. निष्ठावंत कार्यकर्ते ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. उपचार सुरू असतानाही विधानभवनात मतदान करताना त्यांची कर्तव्याप्रति असलेली निष्ठा दिसून आली. आपल्या मतदारसंघात जनहिताचे काम करण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा होता. समाजासाठी वाहून घेतलेल्या दुर्मिळ माणसांपैकी ते एक होते. त्यांच्या निधनामुळे समाजात, पक्षात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, लक्ष्मण जगताप यांनी कर्करोगाशी मोठी झुंज दिली. त्यांचा मूळ स्वभाव संघर्षशील असल्याने त्यांनी कधी हार मानली नव्हती. पिंपरी-चिंचवड परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. सामान्य माणसाशी जोडल्यामुळे अतिशय लोकप्रिय आमदार म्हणून ते परिचित होते. त्यांच्या कल्पक स्वभावामुळे त्यांनी विविध प्रकल्प मतदारसंघात राबविले. यामुळे राज्याच्या राजकीय पटलावर एक प्रमुख नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्यावेळी आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आजारी असतानादेखील मतदान केले. आज आमच्यातून एक योद्धा निघून गेल्यामुळे अतिशय दुःख झाले आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन निघणार नाही, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह उपस्थित मंत्री महोदयांनी जगताप कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शंकर जगताप, विजय जगताप, श्रीमती अश्विनी जगताप, आदित्य जगताप, ऐश्वर्या रेणुशे-जगताप, विराज रेणुशे उपस्थित होते.

तत्पूर्वी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.