मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ थंडावली, शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन

2 जानेवारी रोजी बहादरपुरा येथे सायंकाळी 4.00 वाजता होणार अंत्यसंस्कार

नांदेड ,१ जानेवारी  / प्रतिनिधी :-मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे वयाच्या १०२व्या वर्षी निधन झाले. शेतकरी कष्टकऱ्यांच्या विकासासाठी वेळोवेळी आग्रही भूमिका घेणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांचे वार्धक्यामुळे आज दुःखद निधन झाले. वयाच्या 102व्या वर्षी त्यांनी आज दुपारी अखेरचा श्वास घेतला.

औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून काम पाहिले असून विधानसभेतील त्यांची अनेक भाषणे प्रचंड गाजली. त्यांनी आमदारकी चांगलीच गाजवली होती. म्हणूनच, ५ वेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले होते. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सभागृहात पोटतिडकीने मांडणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेच्या समस्यांसाठी लढणारा लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

केशवराव धोंडगे यांचा जन्म हा नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामधील गरुळ गावी झाला होता. ते पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांची अनेक भाषणे विधानसभेत गाजली आहेत. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोटतीडकिने विधिमंडळ आणि संसदेत मांडले. आणीबाणीच्या लढ्यामध्येही त्यांनी नेतृत्व केले होते. यावेळी तब्बल १४ महिने त्यांनी कारावास भोगला आहे. १९८५मध्ये गुराखीगड स्थापण करुन जागतिक गुराखी साहित्य संमेलन आणि जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलन भरवून अनोखा विक्रम केला.

महाराष्ट्राच्या विधानसभेत नांदेड जिल्ह्यातील कंधार सारख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या भागाचे त्यांनी प्रदीर्घकाळ प्रतिनिधित्त्व केले. डोंगराळ व दुर्गम भागातील शेतकरी, कष्टकरी यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी वाचा फोडून आयुष्यभर आग्रही भूमिका घेतली. आपल्या राजकीय कारकीर्दीत संघर्षाची त्यांनी भूमिका घेतली असली तरी व्यक्तिगत पातळीवर सर्वांशी जपलेला स्नेह व स्पष्ट वक्तेपणा अशी ओळख त्यांनी शेवटपर्यंत जपली.

त्यांच्या शताब्दीनिमित्त विधिमंडळातर्फे काही महिन्यांपूर्वी भव्य सत्कार करण्यात आला होता.  त्यांच्या योगदानाबद्दल विधिमंडळात मान्यवरांनी केलेल्या गौरवाने ते भारावून गेले होते.

त्यांचे पार्थिव औरंगाबाद येथून  बहादरपुरा येथे आज रात्री दहा पर्यंत पोहोचेल. उद्या दिनांक 2 जानेवारी रोजी​ ​बहादरपुरा येथील त्यांच्या शेतातील राहत्या घराजवळ सायंकाळी 4.00 वाजता  त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले जातील अशी माहिती त्यांच्या परिवारातर्फे कळविण्यात आली आहे. 

​मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते व स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांचे निधन झाले. वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. औरंगाबादेतील खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. दीर्घकाळ आमदार खासदार राहिलेल्या धोंडगे यांनी आपली राजकीय कारकिर्दी गाजवली.

नांदेडमधून ते सहा वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सहभाग होता. १९७५ साली आणीबाणीचा विरोध केल्याने त्यांना १४ महिन्यांचा कारावास भोगावा लागला. आणिबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत १९७७ मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता. १९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रोहिदास चव्हाण यांच्याकडून त्यांना पराभव सहन करावा लागला होता. 

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ.भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांचा विधानभवनात २४ ऑगस्ट रोजी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता .

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीस ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर नांदेडमधील सत्काराच्या कार्यक्रमात केशवराव धोंडगे यांनी पवारांचा स्टेजवरच मुका घेतला होता. मात्र त्याच स्टेजवरून त्यांनी पवारांवर सडकून टीका करताना त्यांना बिन चिपळ्यांचा नारद म्हटले होते.

ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांनी १९८५ साली गुराखीगडाची स्थापना केली होती. इतक्यावरच न थांबता त्यांनी जागतिक गुराखी साहित्य संमेलन आणि जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलनही भरवले होते. धोंडगे यांची लढवय्ये नेते अशीही ओळख होती. त्यांनी नवनवीन कल्पना राबवून विविध प्रकारचे सत्याग्रह केले. या सत्याग्रहांमध्ये पिंडदान सत्याग्रह, बोंबल्या सत्याग्रह, शेणचारू सत्याग्रह आणि खईस कुत्री सत्याग्रहांचा समावेश होता. त्यांनी केलेल्या सत्याग्रहांची चर्चा राज्यभरात होत असे.

केशवरावजी शंकरराव धोंडगे यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी मन्याड व पार्वती नदीच्या खोऱ्यात वसलेल्या गऊळ गावी झाला. त्यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले. त्यांनी १९४८ मध्ये श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून ज्ञानदानाचे कार्य केले. औरंगाबाद, नांदेड, कंधारमधील वाडी तांड्यावरच्या मुलामुलींना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली. १२ प्राथमिक शाळा, ११ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, दोन वरिष्ठ महाविद्यालये व एक विधी महाविद्यालय सुरु केले. हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. आणीबाणीच्या काळात कारावासही भोगला.

जनतेच्या न्याय हक्कासाठी श्री.धोंडगे यांनी अनेक आंदोलने केली. त्यांनी ‘वंदे मातरम्’ गीताने दोन्ही सभागृहांच्या सत्राचा प्रारंभ व्हावा, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार डिसेंबर, १९९० पासून दोन्ही सभागृहांच्या सत्रांचा प्रारंभ ‘वंदे मातरम्’ गीताने होऊ लागला आहे. मराठवाडा विकासासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करणे, लोहा तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण असावे यासाठीही विशेष प्रयत्न केले.

नांदेड जिल्ह्यात एसटी डेपोची मागणी, विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात महात्मा फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य शासनाच्यावतीने प्रकाशित करणे अशा अनेक मागण्या त्यांनी शासन दरबारी मंजूर करुन घेतल्या. विविध संसदीय आयुधाचा वापर करून समाजोपयोगी कामे कशी तडीस न्यावीत हे श्री. धोंडगे यांनी दाखवून दिले आहे. श्री. धोंडगे जसे राजकारणी व समाजकारणी आहेत तसे ते पत्रकार व साहित्यिकही आहेत.

लोहा तालुक्याच्या सीमेवर त्यांनी गुराखीगडाची निर्मिती केली. सन १९९१ पासून येथे दरवर्षी जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरविले जाते. श्री. धोंडगे यांनी विपुल लेखन केले आहे. ‘जय क्रांती या साप्ताहिकाचे ते संपादक राहिले असून त्यांनी आजतागायत सुमारे ३० पुस्तकाचे लेखन केले आहे.

‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कार’, ‘धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार’, ‘मराठवाडा रत्न पुरस्कार’, ‘भारतीय विकास रत्न अॅवॉर्ड’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘श्री शिवाजी लोक विद्यापीठ, कल्याण यांनी त्यांना मानद डि. लीट. पदवी प्रदान करुन सन्मानित केले आहे.

सभागृहात भाई बोलायला लागले की विरोधी पक्षानेही कान टवकारून ऐकावे असे त्यांचे सभागृहातील निवेदन असे. जातीपातीच्या जोखडातून समाज मुक्त व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते आणि आहेत. अंधश्रद्धा आणि त्यामुळे येणारी सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक गुलामगिरी यातून भोळ्याभाबड्या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी समाजजागृतीचे कार्य केले. छत्रपतींचा राष्ट्राभिमान, मुत्सद्दीपणा, लोकसंग्रह, महात्मा गांधींची निःस्वार्थ, निरपेक्ष सेवावृत्ती, लोकमान्यांचा कर्मयोग आणि कर्मयोगावर आधारलेली समाजरचना घडवण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला.  उपेक्षित समाजाला जगण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिला.

डॉ. भाई केशवरावजी धोंडगे यांनी 1957, 1962, 1967, 1972, 1985, 1990 अशा तब्बल सहा विधानसभा निवडणुका जिंकल्या. एक अभ्यासू आणि लढवय्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली. त्यानंतर 1975 च्या आणिबाणीनंतर 1977 मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत दिल्लीतही आपल्या वक्तृत्वाची चुणूक दाखविली.ग्रामीण भागातील लोकसाहित्याचे अभ्यासक असलेल्या श्री.धोंडगे यांनी मुक्ताईसुत या नावाने विविध प्रकारचे विपुल लेखन केले आहे. ग्रामीण भागातील लोककलावंताला व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून ते सातत्याने जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचे आयोजन करतात. १९५७ ते १९९५ अशा दहा निवडणुका आणि ११ मुख्यमंत्री पाहिलेले केशवराव धोंडगे यांनी ४० पुस्तके लिहिली आहेत. विधिमंडळात त्यांनी भाषणे, औचित्याचा मुद्दा, तारांकित प्रश्न, लक्षवेधी ही सारी आयुधे वापरत भल्याभल्यांची भंबेरी उडवली.