कोविड महामारीच्या काळात खंडपीठात २४५४ प्रकरणे निकाली

औरंगाबाद खंडपीठ स्थापना समारंभात न्या. संजय गंगापूरवाला यांची माहिती 

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल प्रकरणांच्या संख्येवरून नागरिकांची न्यायाची भूख मोठी असल्याचे सिद्ध होते. न्यायदान होत असल्यामुळेच अधिकाधिक प्रकरणे दाखल होत आहेत. पक्षकारांच्या हक्कासाठी वकील व न्यायमूर्ती प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे मत न्या. संजय गंगापूरवाला यांनी व्यक्त केले.

खंडपीठाच्या ३९ व्या स्थापना समारंभानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात  गुरूवारी (२७ ऑगस्ट)   त्यांनी संबोधित केले.कोरोनामुळे खंडपीठाच्या वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोविड महामारीच्या काळात खंडपीठात ५५१४ प्रकरणे दाखल झाली आणि त्यातील २४५४ निकाली काढल्याचे त्यांनी सांगितले. खंडपीठात तरूण वकिलांची संख्या जास्त असून, त्यांचा न्यायदानातील सहभाग वाखाणण्यासारखा असल्याचे न्या. गंगापूरवाला यांनी सांगितले. कोरोनामुळे मोठे आव्हान आपल्या सर्वासमोर अल्याचे त्यांनी सांगितले. तरूण वकिलांनी भोषेवर प्रभुत्व मिळविले असल्याचे न्या. गंगापूरवाला यांनी सांगितले.प्रास्ताविक वकील संघाचे सचिव शहाजी घाटोळ पाटील यांनी केले. औरंगाबाद खंडपीठात २२ न्यायमूर्तींची पदे मंजूर असून केवळ १२ न्यायमूर्तींच न्यायदानाचे काम करीत आहेत. खंडपीठात पूर्ण क्षमतेने काम होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन इमारतीचे काम पूर्ण करून न्यायदानासाठी उपलब्ध करून द्यावी. कोविडमुळे ई फायलिंग आणि ऑनलाईन प्रकरणे दाखल करण्याची सुविधा खंडपीठातील तरूण वकिलांना उपलब्ध करून द्यावी. यासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा न्यायदान कक्षात प्रत्यक्ष सुनावणी सुरू होईपर्यंत करण्यात यावा अशी मागणी घाटोळ पाटील यांनी केली. अनुराधा पेडगावकर यांनी सुत्रसंचलन तर अश्पाक पटेल यांनी आभार मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *