अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे दिनेश कुमार शुक्ला यांनी स्वीकारली

नवी दिल्ली,३१ डिसेंबर /प्रतिनिधी :-अणू ऊर्जा नियामक मंडळाचे  माजी कार्यकारी संचालक आणि नामांकित शास्त्रज्ञ दिनेश कुमार शुक्ला यांनी अणू ऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून आज, 31 डिसेंबर 2022 रोजी सूत्र स्वीकारली. या पदावर त्यांची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

दिनेश कुमार शुक्ला हे आण्विक संरक्षण या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ म्हणून ओळखले जातात.मध्य प्रदेशातील जबलपूरच्या   शासकीय अभियंता  महाविद्यालयातून 1980 मध्ये मेकॅनिकल  अभियांत्रिकीची  पदवी घेतलेल्या शुक्ला यांनी 1981 मध्ये भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात कामाला सुरुवात केली. ध्रुव या उच्च दर्जाच्या  संशोधन अणुभट्टी उभारण्याच्या कामात त्यांचा सहभाग होता. पुढे भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात अणुभट्टी विषयक  विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी  स्वीकारली. 

2015 मध्ये ते अणुऊर्जा नियमक मंडळ दाखल झाले. तेथे त्यांनी  मंडळाचे सदस्य, अणुभट्टी संचालन सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि  कार्यकारी संचालक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. फेब्रुवारी 2021 मध्ये शुक्ला हे अणुऊर्जा नियामक मंडळातून निवृत्त झाले. त्यानंतर ते अणू उर्जा व्यावसायिकांना संरक्षण आणि नियम यावर मार्गदर्शन करत आहेत.

अणुऊर्जा नियामक मंडळाची स्थापना राष्ट्रपतींनी 15 नोव्हेंबर 1983 रोजी अणुऊर्जा कायदा, 1962 द्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून त्याअंतर्गत विशिष्ट  नियामक  आणि सुरक्षा कार्ये पार पाडण्यासाठी केली होती.