आस्तिक कुमार पाण्डेय यांचे जिल्हाधिकारी म्हणून नवीन वर्षातील संकल्प

औरंगाबाद,३० डिसेंबर / प्रतिनिधी :-  नवीन वर्षात पदार्पण करत असताना आपल्यामध्ये नवीन उत्साह संचारत असतो. आपण नवीन वर्षात अनेक संकल्प करतो. जिल्हाधिकारी म्हणून नवीन वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी मी सुध्दा काही संकल्प केलेले आहेत. हे संकल्प पूर्ण करत असताना प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेच शिवाय यामध्ये सर्व सामान्य नागरिकांचा सहभाग देखील तेवढाच महत्वाचा राहणार आहे. 

  • वेरुळ महोत्सव (Ellora International Festival)-  काही कारणांमुळे अनेक वर्ष या महोत्सवात खंड पडलेला आहे. परंतु आता आपण फेब्रुवारी महिन्यात महोत्सव घेण्याचे नियोजन केलेले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलेला वाव आणि कलाकारांना रोजगार मिळणार आहे. 
  • औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करणे- नागरिकांना गरजेपुरते पाणी पुरविणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेसह जिल्हा प्रशासन देखील प्रयत्नशील आहे. विभागीय आयुक्त स्वत: विषयावर लक्ष ठेवून आहेत. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून लवकरात लवकर पाणी पुरवठ्याच्या समस्येवर मात करण्याचा आमचा मानस आहे. 
  • संत ज्ञानेश्वर उद्यानाचे पुनरुज्जीवन- आपल्या जिल्ह्याची ओळख पर्यटन जिल्हा म्हणून असल्याने येथील पर्यटन स्थळांचे जतन, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान देखील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. सध्या हे पर्यटन स्थळ बंद असले तरी त्याच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासन ‘मिशन मोड’ वर काम करत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. याबाबत वेळोवेळी मंत्रालयात बैठका घेऊन उद्यानासाठी निधीची मागणी करण्यात आल्याने शासनाने उद्यानासाठी पर्यटन योजनेतून 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीतून देखील निधीची उपलब्धता करण्यात येणार असल्याने लवकरच संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी खुले होणार आहे. 
  • वेरुळ – घृष्णेश्वर मंदिर व परिसराचा विकास- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे ज्योतिर्लिंग आहे. या परिसराचा विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून परिसराचा विकास करण्यात येणार आहे.
  • क्रीडा विद्यापीठाच्या कामाला प्राधान्य- जिल्ह्याच्या आणि पर्यायाने मराठवाड्याच्या क्रिडा संस्कृतीला चालना देण्यासाठी क्रिडा विद्यापीठ महत्वाची भूमिका बजावणार आहे. विद्यापीठाच्या संरक्षक भिंतीसाठी जिल्हा नियोजन समीती मधून 6 कोटी 62 लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. 
  •  लेबर कॉलनीच्या जागेवर प्रशासकीय संकुल बांधणे- विश्वासनगर- लेबर कॉलनी येथील 14 एकर शासकीय जागेवर प्रस्तावित नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रशासकीय भवन बांधण्यासाठी प्रस्ताव, अंदाजपत्रक, वास्तुशास्त्रीय आराखडे तयार करुन परिपुर्ण प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाकडे सादर केलेला आहे. मंजुरी प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. डीपीडीसीमधून संरक्षक भिंतीसाठी 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. 
  • म्हैसमाळ येथील गिरजामाता मंदिर व परिसर  विकास- म्हैसमाळ हे  थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील प्रसिध्द असल्याने येथे पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. गिरजामाता मंदिर व परिसरा विकासासाठी प्रशासन प्रयत्न करत असून येथील स्थानिक समस्या सोडविण्यासाठी देखील प्रयत्न केल्या जाणार आहेत. 
  • उद्योगामध्ये गुंतवणूक- ऑरिक सिटी, डिएमआयसी तसेच वाळूज एमआयडिसीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक आणणे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्योगांना सेवा सुविधा कशा प्रकारे पुरविता येतील याला प्राधान्य राहणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त उद्योग आपल्या जिल्ह्याकडे आकर्षित होतील. 
  • G-20 परिषदेची तयारी- या परिषदेची बैठक शहरात होणार आहे. या परिषदेच्या नियोजनासाठी महानगर पालिकेला निधी प्राप्त झालेला आहे. या निधीच्या माध्यमातून शहरातील अनेक विकास कामे होत असल्याने नक्कीच काही दिवसांतच शहराचे रुपडे पालटणार आहे. 
  •  पर्यटन- जिल्ह्याला पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे. पर्यटन संवर्धनासाठी प्रशासन प्रयत्नशील असणार आहे. वेरुळ लेणी, अजिंठा लेणी तसेच इतर पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांसाठी सोयी सुविधा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. वेरुळ आणि अजिंठा येथील व्हिजीटर सेंटर कार्यान्वित. 
  • सौर ऊर्जेवरील जलसुद्धीकरण केंद्र-  जिल्हा नियोजन समितीतून ग्रामीण भागात सौर ऊर्जेवर चालणारे जलशुद्धीकरण केंद्र सुरु करण्याची एक संकल्पना आहे. 20 हजार लिटरची पाण्याची टाकी बसवून बहुतांश गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याचा संकल्प आहे. 
  • चला जाणूया नदीला- या अभियानामध्ये  जिल्ह्यातील खाम, शिवना आणि सुखना या  तीन नद्यांचा समावेश झालेला आहे. या नद्यांमधील प्रदुषण कमी करुन नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस आहे. 
  • स्थानिक कलेचे ब्रँडिंग- पैठणी, हिमरु, बिद्री या येथील उपजत कला आहेत. त्यांचे ग्लोबल मार्केटिंग करण्याचा मानस आहे
  • विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण– भूसंपादन मसुदा अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी 450 ते 550 कोटीदरम्यान रक्कम लागणार आहे. 
  • अजिंठा रस्ता- जिल्ह्याच्या विकासात या रस्त्याचे महत्व आहे. हा रस्ता जानेवारी अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रनांना दिलेले आहेत. 
  • शाळांची गुणवत्ता वाढ- शिक्षणासाठी नियोजन समितीतून स्मार्ट क्लासेस ही संकल्पना मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवता वाढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. 
  • ट्रासफॉर्मरसाठी निधी- वीज रोहित्रांसाठी ‘डीपीसी’तून 40 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे बळीराजाला फायदा होणार आहे. 
  • स्मशानभुमीसाठी निधीची तरतूद- ग्रामीण भागात स्मशानभूमी बांधकामांसाठी 30 कोटींची तरतूद केली आहे. 
  • कोल्हापुरी बंधारे अधिक सक्षम करणे-  जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे अधिक सक्षम करण्याचे काम अजेंड्यावर आहे.