भारतीय रेल्वेचा कायापालट करण्यासाठी एक देशव्यापी मोहीम सुरू-पंतप्रधान नरेंद्र मोदी

जड अंत:करणाने मोदी कर्तव्यावर परतले!

गांधीनगर,३० डिसेंबर / प्रतिनिधी :- आई हिराबेन यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजभवनात पोहोचले. या ठिकाणाहून ते पश्चिम बंगाल येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग द्वारे सहभागी झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हावडा आणि न्यू जलपायगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला  दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. पंतप्रधानांनी जोका-एस्प्लनेड मेट्रो प्रकल्पाच्या( पर्पल लाईन) जोका- तराताला पट्ट्याचे देखील उद्घाटन केले. यावेळी त्यांनी बोईन्ची- शक्तीगड तिसरा मार्ग, दांकुनी- चंदनपूर चौथ्या मार्गाचा प्रकल्प, निमतीता- न्यू फराक्का दुहेरी मार्ग आणि अंबारी फलाकाटा- न्यू मैनागुडी – गुमानीहात दुहेरीकरण प्रकल्प यांचा समावेश असलेल्या चार रेल्वे प्रकल्पांचे देखील त्यांनी राष्ट्रार्पण केले.

न्यू जलपायगुडी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची देखील त्यांनी पायाभरणी केली. यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर आपले विचार करताना पंतप्रधान यांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. प्रत्येक कणाकणात स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास सामावून घेतलेल्या बंगालच्या भूमीला नमन करण्याचा आजचा दिवस आहे, असे ते म्हणाले. “ज्या भूमीवरून वंदे मातरमचा प्रारंभ झाला त्या भूमीने आज वंदे भारतला रवाना होताना पाहिले”, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. 

30 डिसेंबर 1943 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान आणि निकोबार बेटांवर तिरंगा ध्वज फडकवला आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी होणाऱ्या चळवळींना गती दिली याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. या ऐतिहासिक दिवसाच्या 75 व्या वर्धापनदिनी पंतप्रधानांनी माहिती देताना सांगितले की नेताजींच्या सन्मानार्थ एका बेटाला त्यांचे नाव देण्यासाठी अंदमानला भेट देण्याची संधी आपल्याला मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्या दरम्यान 475 वंदे भारत गाड्या सुरू करण्याचा भारताचा संकल्प आहे आणि हावडा ते न्यू जलपायगुडी दरम्यान रवाना करण्यात आलेली गाडी ही त्यापैकीच एक आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले आहे त्यांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितले की हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार सुमारे 5000 कोटी रुपये खर्च करत आहे.

गंगा नदीची स्वच्छता आणि पश्चिम बंगालला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याशी संबंधित अनेक प्रकल्प समर्पित करण्याची संधीही आपल्याला मिळणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये नमामि गंगे योजनेंतर्गत २५ पेक्षा  जास्त सांडपाणी / मलनिःसारण प्रकल्प मंजूर केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पांपैकी ११ प्रकल्प याआधीच पूर्ण झाले आहेत, तर सात प्रकल्प आज पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय १५०० कोटी रुपये खर्चाच्या ५ नव्या योजनांचे कामही आजपासून सुरू होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी स्वच्छताविषयक प्रकल्पांपैकी महत्त्वाच्या असलेल्या आदि गंगा या एका प्रकल्पाचाही उल्लेख केला, या प्रकल्पाअंतर्गत  600 कोटी रुपये खर्चून आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, नद्यांच्या स्वच्छतेबरोबरच केंद्र सरकारने नद्या प्रदुषित होण्यापासून रोखण्यावरही लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करता येतील असे असंख्य आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेले प्रकल्प उभारले जातील असे त्यांनी सांगितले. पुढच्या १०-१५ वर्षांच्या गरजा लक्षात घेऊनच केंद्र सरकार हे सर्व प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

भारतीय रेल्वेतील सुधारणा आणि विकास हा देशाच्या विकासाशी जोडलेला आहे असे पंतप्रधान म्हणाले. हे लक्षात घेऊनच केंद्र सरकार रेल्वे क्षेत्रासाठीच्या आधुनिक पायाभूत सोयीसुविधांकरता विक्रमी गुंतवणूक करत असल्याचं ते म्हणाले. भारतीय रेल्वेचा कायापालट करण्यासाठी देशव्यापी मोहीम हाती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. वंदे भारत, तेजस हम सफर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावरच्या रेल्वे गाड्या विस्टाडोम कोच / रेल्वे डबे तसेच न्यू जलपाईगुडीसह अनेक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण ही या आधुनिकीकरणाची उदाहरणे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी पूर्व आणि पश्चिम क्षेत्रासाठी समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचा उल्लेख केला. यामुळे दळणवळण क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल घडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वे सुरक्षा, स्वच्छता, समन्वय, क्षमता, वक्तशीरपणा आणि विविध सेवासुविधा या क्षेत्रांमध्ये देशाने केलेल्या प्रगतीचाही पंतप्रधानांनी ठळकपणे उल्लेख केला. गेल्या 8 वर्षात भारतीय रेल्वेने आधुनिकतेचा पाया अधिक भक्कम करण्याचं काम केले आहे, आणि येत्या काही वर्षांत भारतीय रेल्वेचा आधुनिकीकरणाच्या दिशेने सुरू झालेला नवा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या पहिल्या 70 वर्षांमध्ये देशभरात 20 हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले, मात्र 2014 पासून आतापर्यंत 32 हजार किलोमीटरपेक्षाही जास्त रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण केले गेले असल्याची  माहिती पंतप्रधानांनी दिली. मेट्रो रेल्वे प्रणाली म्हणजे आजच्या भारताचा वेग आणि भारताच्या यशाचा पल्ला याचे मोठे उदाहरण आहे असे पंतप्रधान म्हणाले. “2014 च्या आधी देशभरातले मेट्रो रेल्वेचे जाळे 250 किमीपेक्षा कमी होते, त्यातही दिल्ली राजधानी क्षेत्राचा सर्वाधिक वाटा होता. मात्र गेल्या 7-8 वर्षांत देशभरातील २ डझनहून अधिक शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार झाला आहे. आज देशातील विविध शहरांमधल्या मिळून सुमारे 800 किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांवर मेट्रो धावत आहे, तर त्याचवेळी देशभरात 1000 किमीपेक्षा जास्त लांबीच्या मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या काही वर्षांत भारतासमोर असंख्य नवी आव्हाने उभी ठाकल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. या सगळ्याचा देशाच्या विकास प्रक्रीयेवर नकारात्मक परिणाम झाला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याशी संबंधित असलेल्या विविध यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे अधोरेखित करत, त्यांनी देशासमोरच्या एका महत्त्वाच्या आव्हानाचाही ठळकपणे उल्लेख केला. वाहतूक आणि दळणवळणाशी संबंधीत विविध यंत्रणांमध्येही समन्वयाचा अभाव असल्याचा उल्लेख त्यांनी केला. आणि यामुळेच  एक सरकारी यंत्रणा काय काम करत आहे, त्याची दुसऱ्या यंत्रणेला मात्र कल्पना नसते असे त्यांनी खेदाने नमूद केले. या सगळ्याचा थेट प्रभाव देशभरातल्या प्रामाणिक करदात्यांवर पडत असल्याचे ते म्हणाले.

ज्यावेळी  त्यांच्या कष्टाचा पैसा गरीबांच्या उपयोगी येण्‍याऐवजी  भ्रष्टाचाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी वापरला जातो, त्यावेळी  असंतोष होणे स्वाभाविक आहे, असे   पंतप्रधान म्हणाले. सरकारने  विविध संस्थांमधील समन्वयातील पोकळी भरून काढण्यासाठी ‘पीएम गती शक्ती’ योजना सुरू केली आहे, असे सांगून  मोदी म्हणाले, “ मग यामध्‍ये विविध राज्य सरकारे असोत, बांधकाम संस्था असोत किंवा उद्योग तज्ञ असोत, प्रत्येकजण गति शक्ती मंचावर एकत्र येत आहेत.” ते पुढे म्हणाले की,  पीएम गति शक्ती केवळ देशातील विविध वाहतूक माध्यमांना जोडण्यापुरती मर्यादित नाही,  तर बहुविध प्रकल्पांना गती प्रदान करते. पंतप्रधान पुढे म्हणाले की, नागरिकांना अखंड संपर्क साधनांची उपलब्धता  सुनिश्चित करण्यासाठी नवीन विमानतळे , जलमार्ग, बंदरे आणि रस्त्यांची  कामे  केली जात आहेत. “21 व्या शतकात पुढे जाण्यासाठी देशाच्या अमर्याद क्षमतेचा आपण योग्य वापर केला पाहिजे”, असे पंतप्रधानांनी नमूद केले. देशातील जलमार्गांवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी प्राचीन  काळाचे स्‍मरण  करून दिले.  ज्यावेळी भारतामध्‍ये  कामधंदा,  व्यवसाय आणि पर्यटनासाठी जलमार्गांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता; परंतु नंतर गुलामगिरीच्या काळात असा वापर  होणे थांबले. देशातील जलमार्ग पुनरुज्जीवित करण्यासाठी पूर्वीच्या सरकारांनी केलेले प्रयत्‍न खूप कमी होते, हे  त्यांनी निदर्शनास आणून दिले. “भारत आज आपल्या जलशक्तीला चालना देण्यासाठी कार्यरत आहे”,  असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, आता देशात  100 हून अधिक जलमार्ग विकसित केले जात आहेत. त्यामुळे  व्यवसाय आणि पर्यटनाला चालना दिली जात आहे. यासाठी नद्यांमध्ये अत्याधुनिक क्रूझ- जहाजे सुरू करण्यात येणार असून , त्यासाठी काम सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन मोठ्या  नद्यांना जोडणा-या जलमार्ग प्रकल्पाचे काम सुरू आहे, असे सांगून, या भारत आणि बांगलादेश दरम्यान सुरू असलेल्या प्रकल्पावरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. येत्या 13 जानेवारी 2023 रोजी काशी ते दिब्रुगढ हा  जलमार्ग सुरू करण्‍याच्या दृष्‍टीने सर्व सज्जता करण्‍यात आली आहे.  देशातील वाढत्या क्रूझ पर्यटनाचे प्रतिबिंब या जलप्रवासात पहायला मिळेल. बांगलादेशला जाणार्‍या  क्रूझचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सांगितले की, 3200 किमी लांबीचा क्रूझ पर्यटनाचा  हा संपूर्ण जगात पहिलाच प्रवास असणार आहे.

पश्‍चिम बंगालमधील लोकांचे भूमीवरील प्रेम अधोरेखित करून, पंतप्रधान म्हणाले,  भारतातील विविध सांस्कृतिक वारशाच्या ठिकाणांना ते  भेटी देतात  आणि त्यातून ब-याच गोष्‍टी शिकतात,  सगळ्या गोष्‍टींविषयी बंगालचे लोक उत्‍साह दाखवत असतात. असे भाष्‍य करून पंतप्रधान मोदी म्हणाले,   “बंगालच्या लोकांमध्ये ‘नेशन फर्स्ट’ – राष्‍ट्र प्रथम  ही भावना, अगदी पर्यटना विषयीही दिसून येते”, ते पुढे म्हणाले, “ज्यावेळी प्रांतातील दळणवळणाला, संपर्क साधनांना चालना मिळते, आणि रेल्वे, जलमार्ग आणि महामार्ग अधिक प्रगत होत असतात, त्यावेळी  त्याचा परिणामही चांगला होतो.  म्हणजे प्रवास सुलभ होतो आणि याचा फायदा बंगालच्या लोकांनाही झाला आहे,” असे मत पंतप्रधान मोदी यांनी नोंदवले.

“माझ्या देशाची माती ही,

करीतो तुजला नमन मी”

अशा अर्थाच्या गुरू रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील काही ओळी उद्धृत करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. स्वातंत्र्याच्या या या अमृत कालावधीमध्ये सर्वांनी आपल्या मातृभूमीला सर्वोच्च प्राधान्य देऊन एकत्र काम केले पाहिजे,असे पंतप्रधानांनी सूचित केले.“संपूर्ण जग भारताकडे आकांक्षा आणि अपेक्षांच्या नजरेने पाहत आहे.देशातील प्रत्येक नागरिकाने स्वत:ला देशसेवेसाठी झोकून दिले पाहिजे”,असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सीव्ही आनंद बोस,केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री जॉन बरला, डॉ सुभाष सरकार आणि  निसिथ परमाणिक आणि  संसद सदस्य प्रसून बॅनर्जी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हावडा रेल्वे स्थानकावर हावडा ते न्यू जलपाईगुडी यांना  जोडणाऱ्या सातव्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.अत्याधुनिक सेमी हाय-स्पीड अशी ही रेल्वेगाडी उत्तम प्रकारच्या आधुनिक प्रवासी सोयी सुविधांनी सुसज्ज आहे.मालदा टाउन, बारसोई आणि किशनगंज या  स्थानकांवर दोन्ही बाजूंना ही  रेल्वेगाडी थांबेल.

पंतप्रधानांनी जोका-एस्प्लेनेड मेट्रो प्रकल्पाच्या (पर्पल लाईन) जोका-ताराताळा मार्गाचेही  उदघाटन यावेळी केले.जोका, ठाकूरपुकुर, साखर बाजार, बेहाला चौरस्ता, बेहाला बाजार आणि तरातला या 6 स्थानकांसह 6.5 किमी लांबीचा हा मेट्रो मार्ग 2475 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला आहे.  सरसुना, डाकघर, मुचीपारा आणि दक्षिण 24 परगणा या कोलकाता शहराच्या दक्षिणेकडील भागांतील प्रवाश्यांना या प्रकल्पाच्या उदघाटनाने मोठा लाभ होणार आहे.

पंतप्रधानांनी चार रेल्वे प्रकल्पही आज राष्ट्राला समर्पित केले.यामध्ये 405 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या बोईंची – शक्तीगढ  तिसरा मार्ग, 565 कोटी रुपये खर्चून विकसित केलेला दानकुनी – चंदनपूर चौथा मार्ग प्रकल्प;  निमतिता -न्यू  फरक्का हा 254 कोटी रुपये खर्चून  बांधलेला दुहेरी मार्ग आणि. 1080 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केलेला अंबारी फलकाटा – न्यू मायनागुडी – गुमानीहाट दुहेरीकरण प्रकल्प या चार मार्गांचा समावेश आहे. न्यू जलपाईगुडी रेल्वेस्थानकाच्या 335 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चून केल्या जाणाऱ्या  पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधानांनी आज  केली.