नुकसान भरपाईपोटी परभणी जिल्ह्यात  ७२ हजार ५७६ लाभार्थी शेतकऱ्यांना ४० कोटी रुपये वाटप – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर ,३० डिसेंबर/ प्रतिनिधी :-शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अधिक मिळाली पाहिजे यासाठी शासन सकारात्मक आहे. परभणी जिल्ह्यात  सोयाबीन पिकाकरिता आठ महसूल  मंडळामध्ये  73 हजार 814 शेतकरी अर्जदारांना नुकसान भरपाई पोटी 40.71 कोटी रुपये निश्चित करण्यात आले असून त्यापैकी 72 हजार 576 शेतकरी लाभार्थ्यांना ही रक्कम वाटप करण्यात आली आहे. नुकसान भरपाईपोटी 40.9 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम 63 कोटी रुपये बाकी असून लवकरात लवकर ही रकम वाटप केली जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

परभणी जिल्ह्यातील 44 मंडळाचा अग्रीम पीक विमा रकमेसाठी समावेश केल्याबाबतचा प्रश्न डॉ.राहुल पाटील यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री श्री.देसाई बोलत होते .

श्री देसाई म्हणाले,परभणी जिल्ह्यात सलग 21 दिवस पावसाचा खंड झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली असूनही प्रशासनाने केवळ आठ मंडळाचाच अग्रीम रकमेसाठी समावेश केला असून उर्वरित 44 मंडळाचा अग्रीम रकमेसाठी समावेश करण्यात आल्या नाही ही वस्तुस्थिती आहे. खरीप हंगाम 2022 मधील प्रतिकूल परिस्थिती या बाबीअंतर्गत पावसातील तीन आठवडे व त्यापेक्षा जास्त पावसाचा खंड नसल्यामुळे या 44 महसूल मंडळामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेमधील चालू वर्षाच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित नसल्याने अधिसूचनेत समावेश करण्यात आला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

पर्जन्यमापक यंत्रात त्रुटी  असल्याबाबत महसूल व कृषी विभागाला सूचना करून या यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.   या प्रश्नावरील चर्चेत सदस्य सर्वश्री सुरेश वरपूडकर, प्राजक्त तनपुरे यांनी घेतला होता.