सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमीन हस्तांतरणाबाबत एमटीडीसी आणि हॉटेल ताजमध्ये सामंजस्य करार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी
पंचतारांकित पर्यटन केंद्राद्वारे कोकणातील पर्यटनाला मिळणार चालना

मुंबई, दि. २७ : मौजे शिरोडा वेळागर (जि. सिंधुदूर्ग) येथील जमीन हस्तांतरण करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताज यांच्यामध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील शासन निर्णयानुसार मौ. शिरोडा वेळागर (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याकरिता मे. इंडियन हॉटेल्स प्रा. लि. (ताज ग्रुप) यांना संपादीत केलेली व शासकीय जमीन मिळून एकूण ५४.४० हेक्टर जमीन ९० वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्याकरिता भाडेकरार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मे. इंडियन हॉटेल प्रा. लि. (ताज ग्रुप) यांच्यामध्ये लीज डीड व सब लीज डीड हे दोन करार करण्यात आले.

बाजूच्या गोवा राज्यात अनेक पंचतारांकित प्रकल्प, हॉटेल्स, रिसॉर्ट अस्तित्वात आहे. मे. इंडियन हॉटेल प्रा.लि.(ताज ग्रुप) ही एक नामांकित संस्था असून त्यांच्यामार्फत कोकणामध्ये प्रथमच पंचतारांकित प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मे. इंडियन हॉटेल प्रा.लि. (ताज ग्रुप) हे पहिल्या टप्पात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या प्रकल्पामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यात देशी व परदेशी पर्यटक आकर्षित होतील. तसेच यामुळे रोजगार निर्मिती व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळेल.

याबरोबरच ताडोबा परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग आणि थ्रायव्हींग हॉटेल्स प्रा. लि. यांच्यामध्येही यावेळी सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, ताडोबातील वाघ, राज्यातील विविध समुद्रकिनारे, जंगल, गडकिल्ले हे राज्याचे भांडवल आहे. आपण जगासमोर हे चांगल्या पद्धतीने मांडले पाहिजे. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढणे आवश्यक असून त्यासाठी राज्य शासनामार्फत प्रोत्साहन दिले जाईल. पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देणे ही अभिनव कल्पना आहे. लॉकडाऊनच्या काळात पर्यटन बंद असले तरी कोरोनाचे संकट संपल्यानंतर या व्यवसायाला निश्चितच चालना मिळेल. ताज हॉटेलने कोकणात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक केल्याने कोकणातील वैभवाची जगाला ओळख होईल. राज्याच्या इतर भागातही अशा विविध प्रकल्पांना शासनामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पर्यटन हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे राज्यात पर्यटन विकासासाठी शासनामार्फत संपूर्ण सहकार्य केले जाईल. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून चांगली सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात यावा. तसेच या प्रकल्पासाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यात यावा. राज्यातील कोस्टल रोडसाठी केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करु. तसेच पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, पुढील ६ महिन्यात राज्याच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा अधिकाधिक राहील यासाठी प्रयत्न करु. पर्यटन विभागामार्फत यासाठी विविध संकल्पना राबविण्यात येत असून कोरोना संकटानंतर राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसअंतर्गत हॉटेल व्यवसायासाठी परवानग्यांची संख्या कमीतकमी करण्याचा प्रयत्न आहे. एमटीडीसी आणि ताज हॉटेलच्या समन्वयातून कोकणात साकारत असलेल्या पर्यटन प्रकल्पातून कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, आज झालेल्या सामंजस्य करारातून कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. ताज हॉटेलच्या या गुंतवणुकीमुळे देश आणि विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने कोकणाकडे आकर्षित होतील. कोकणातील समुद्रकिनारे, इथला निसर्ग हा मोठा नैसर्गिक ठेवा आहे. याची माहिती जगापर्यंत पोहोचवून कोकणात पर्यटन विकास आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी पर्यटन विभाग काम करेल, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, मे. इंडियन हॉटेल प्रा.लि. (ताज ग्रुप) चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि जनरल कौन्सेल राजेंद्र मिस्रा, वरिष्ठ उपाध्यक्ष बिजल देसाई, थ्रायव्हींग हॉटेल्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *