‘पठाण’मधील भगव्या रंगाच्या बिकनीवरून वाद; सेन्सॉर बोर्डाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई ,२९ डिसेंबर / प्रतिनिधी :- बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा आगामी ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहेत. ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खान बऱ्याच वर्षांनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, त्याच्या कमबॅक पेक्षा हा चित्रपट एका वेगळाच वादात सापडला आहे. या चित्रपटाचे गाणे ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झाल्यानंतर भाजपसह अनेक हिंदू संघटनांनी या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकनीवर आक्षेप घेतला. त्यानंतर आता सेन्सॉर बोर्डाने याबाबतीत महत्त्वाचे पाऊल उचलत एक निर्णय घेतला. चित्रपट सेन्सॉरशिपसाठी आला असता त्यांनी चित्रपटामध्ये काही बदल करण्यास सुचवले आहेत.

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पठाण चित्रपट नुकताच सीबीएफसी समितीकडे प्रमाणपत्रासाठी दाखवण्यात आला. यावेळी सेन्सॉर बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याचे परीक्षण करण्यात आले. यादरम्यान परीक्षक समितीने निर्मात्यांना गाण्यांसह चित्रपटात काही बदल करण्याचे सुचवले. या सुचवलेल्या बदलांची अंमलबजावणी कशी करावी? याचे मार्गदर्शनही केले आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्याची सुधारित कॉपी सेन्सॉरकडे सादर करावी” असे आदेश निर्मात्यांना देण्यात आले आहेत.

किंग खान शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला पठाण हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला देशभर प्रदर्शित होणार आहे. मात्र, या चित्रपटावर ‘बॉयकॉट’चे काळे ढग आले आहेत. कारण, ‘बेशरम रंग’ या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकनीवरून चांगलाच वाद झाला. अशा प्रकारच्या कृत्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याचे टीका करण्यात आली. अनेक ठिकाणी तर या चित्रपटाविरोधात मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. तसेच, शाहरुख खान आणि दीपिकाचे पोस्टर जाळत लोकांनी याचा निषेध दर्शवला. तसेच, अनेक भाजप नेत्यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला.