सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास ५० कोटी रुपये – मंत्री अब्दुल सत्तार

नागपूर ,२९ डिसेंबर/ प्रतिनिधी :- “परभणी येथील  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ५० कोटी रुपये कृषी संशोधन आणि इतर अनुषंगिक उपक्रमासाठी देण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी २५ कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल आणि उर्वरित निधी आवश्यकतेनुसार देण्यात येईल”, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत दिली. तसेच कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया येत्या तीन महिन्यात सुरू करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले

विधानसभा सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सत्तार यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून कृषी विकासाचे काम होत आहे. कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण आदी माध्यमातून कृषी बळकटीकरण आणि शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.विद्यापीठांस ५० वर्ष पूर्ण झाल्या निमित्त ५० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.