मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ,२८ डिसेंबर/ प्रतिनिधी :- मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ते बोलत होते. श्री.फडणवीस पुढे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री व कर्नाटक सरकारला निषेधाचे पत्र पाठविण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत नव्याने दावे केले जाणार नाहीत असे ठरले होते. आता मुंबईसंदर्भात कर्नाटक सरकारने केले ते दावे बैठकीतील ठरावाच्या विसंगत प्रकारचे दावे आहेत.

सभागृह याचा निषेध करित आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांना पत्राद्वारे कळविले जाईल केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर जे ठरले आहे त्याचे उल्लंघन करणे हे खपवून घेणार नाही, असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

कर्नाटक सरकारचे कायदे मंत्री माधू स्वामी यांनी मुंबईला केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर करावा अशी मागणी त्यांच्या विधान परिषदेत केली. मुंबईमध्ये 20 टक्के लोक कन्नड भाषिक राहतात असा जावई शोध त्यांनी लावला. तर कर्नाटकचे विधान परिषदेचे सदस्य लक्ष्मण सौदी यांनी तर मुंबई ही कर्नाटकची आहे असा दावा करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. सीमाप्रश्नाला अशा प्रकारे चुकीचे वळण देण्याचे व सीमावासियांच्या भावनेला ठेच पोहोचवण्याचे प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होतोय, ही माहिती विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फोर्मेशनद्वारे सभागृहात मांडली.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या कर्नाटक सरकारच्या दोन्ही वक्तव्याचा तीव्र निषेध करावा. तसेच ही माहिती केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात यावी. असे प्रकार पुन्हा खपवून घेतले जाणार याबद्दल त्यांना ताकीद द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सभागृहात करत कर्नाटकचे कायदे मंत्री व त्यांच्या आमदारांचा तीव्र निषेध व्यक्त केला.