खास बाब म्हणून औरंगाबादेत महिला कृषी महाविद्यालय सुरू करणार

आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची विधान परिषदेत घोषणा

नागपूर ,२७ डिसेंबर/ प्रतिनिधी :-औरंगाबाद येथे खास बाब म्हणून महिला कृषी महाविद्यालय सुरू केल्या जाईल अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी आज (दि.27) विधान परिषदेत केली. औरंगाबादेत महिला कृषी महाविद्यालय सुरू करावे यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी नियम 93 अन्वये सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

        औरंगाबाद येथे महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सादर केलेल्या प्रस्तावास कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 2 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. औरंगाबाद जिल्ह्यातील जमीन अत्यंत सुपीक असून जिल्ह्यात जायकवाडी, शिवना टाकळी, गिरजा, नांदूर- मधमेश्वर असे मोठे प्रकल्प आहेत. उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या औरंगाबाद परिसरातील मुलींना शेती विषयक ज्ञान उपलब्ध व्हावे व शेती सुधारण्यास पर्यायाने आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होईल असे ते म्हणाले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याचे पहिले कृषी मंत्री म्हणून आपण ठाम भूमिका घ्यावी व खास बाब म्हणून औरंगाबाद येथे महिला कृषी महाविद्यालय सुरू करावे अशी आग्रही भूमिका आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात मांडली.

        आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नावर उत्तर देतांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र औरंगाबादेत सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचे सांगितले. मात्र यावर आ.सतीश चव्हाण यांचे समाधान झाले नाही. खास बाब म्हणून औरंगाबादेत महिला कृषी महाविद्यालय सुरू करा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली. अखेर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आ.सतीश चव्हाण यांच्या भावना लक्षात घेता, महिलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी खास बाब म्हणून एक महिला कृषी महाविद्यालय औरंगाबादेत सुरू केल्या जाईल अशी घोषणा सभागृहात केली.