खास बाब म्हणून खुलताबादेत ट्रामा केअर सेंटर मंजूर

आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची विधान परिषदेत घोषणा

नागपूर ,२६ डिसेंबर/ प्रतिनिधी :-खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात खास बाब म्हणून ट्रामा केअर सेंटर मंजूर केल्याची घोषणा आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत केली. खुलताबाद तालुक्यात ट्रामा केअर सेंटर संदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

        खुलताबाद शहरालगतच सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग असून खुलताबाद तालुका हा जगप्रसिध्द वेरूळ लेणी तसेच धार्मिक व पर्यटनस्थळांमुळे प्रसिध्द आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. मागील पाच वर्षात तालुक्यात जवळपास एक हजार अपघात झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी ट्रामा केअर सेंटरची नितांत आवश्यता असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याठिकाणी ट्रामा केअर सेंटर मंजूर व्हावे यासाठी आरोग्य विभागाने शासनस्तरावर तीन वेळेस प्रस्ताव पाठवला मात्र तरी देखील आरोग्य सेवा संचालनालयाने परत औरंगाबाद आरोग्य सेवा उपसंचालकांना सुधारित प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविले आहे. सुपर क्लास वन अधिकारी जर परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी आ.सतीश चव्हाण यांनी केली. खुलताबाद तालुक्यात होणार्‍या अपघातांची संख्या पाहता याठिकाणी त्वरित ट्रामा केअर सेंटर मंजूर करावे, तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे रूग्णांना मिळणारे आर्थिक लाभाचे दर मागील दहा वर्षांपासून तसेच आहेत. त्यामुळे यामध्ये देखील वाढ करावी अशी आग‘ही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली.

        आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासंदर्भात शासनाने काही निकष ठरवून दिलेले आहेत. मात्र खुलताबाद तालुक्यातील अपघाताची तीव‘ता पाहता याठिकाणी ट्रामा केअर सेंटर मंजूर केल्याची घोषणा विधान परिषदेत केली. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून रूग्णांना मिळणार्‍या आर्थिक लाभामध्ये निश्चितच सुधारणा करणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून पंधरा दिवसता योग्य तो निर्णय घेतला जाईल असे मंत्री महोदयांनी सभागृहात सांगितले.