विनायक साखर कारखान्याच्या कामगारांचे थकीत वेतनासाठी उपोषण

वैजापूर,२६ डिसेंबर / प्रतिनिधी :-
वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील बंद पडलेल्या विनायक सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा थकित वेतन मिळण्यासाठी मागील वीस वर्षांपासुन लढा सुरु आहे. मात्र, अद्याप यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे कामगारांनी येथील उपविभागिय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. थकित वेतनासाठी निर्णय न झाल्यास 26 डिसेंबरपासून कुटुंबियांसोबत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

थकित देणी मिळण्यासाठी कामगार संघटनेने अवसायक तथा जिल्हाधिकारी, साखर आयुक्त, सहकार सचिव, सहकार मंत्री, मुख्यमंत्री आदींची वेळोवेळी भेट घेऊन निवेदन दिले. उच्च न्यायालयात वेतन अंतिम करण्यासाठी याचिका दाखल केली. वेतन अंतिम केल्याचा तपशील प्राप्त झाला आहे. त्याआधारे कामगारांनी वेतन मिळण्यासाठी शासनाच्या सर्व स्तरांवर पाठपुरावा केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही असे निवेदनात म्हटले आहे. उपोषणाची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बॅकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी, भाजपचे नबी पटेल यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वेतन मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन डॉ. परदेशी यांनी दिले.‌यावेळी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. शासनापर्यंत कामगारांच्या मागण्या पोहचवू असे त्यांनी कामगार संघटनेला सांगितले.वैजापूर येथे सुरु असलेल्या साखर कामगारांच्या उपोषणाला कारखान्याचे माजी शेतकी अधिकारी पी.जी.पवार यांनीही भेट देऊन मार्गदर्शन केले.