ज्योतीराम धोंडगेची न्यायालयात शरणागती:५ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद,२३ डिसेंबर / प्रतिनिधी :-   विवाहितेवर बलात्कार, गर्भपात, ब्लॅकमेलिंग, रक्कम उकळणे, पिस्तूलाचा धाक दाखवणे अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यासाठी पोलिसांना हवा असलेला शिंदे गटाचा आरोपी ज्योतिराम धोंडगे हा तब्बल १०२ दिवसानंतर न्यायालयात शरण आला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याला ५ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत म्हणजे हर्सुल कारागृहात रवाना केले.
फिर्यादीनुसार, सिडको, एन-२, ठाकरेनगरातील एका २८ वर्षीय महिलेस शिंदे गटाच्या ज्योतीराम धोंगडे याने लग्नाचे आमिष दाखवून तिचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ बनविले. न्यूड फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ज्योतीराम पाटील याने तिला वेळोवेळी हॉटेलमध्ये नेउâन बलात्कार केला. नंतर तिचा गर्भपातही घडवून आणला. तसेच त्याने तिच्याकडून ३५ लाखांचे दागिने व रोख रक्कम अशी एकूण दोन कोटींची रक्कम देखील उकळली. लग्नाचा तगादा लावला असता त्याने तिला बंदुकीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देत लग्नास नकार दिला, असा गुन्हा मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून त्याच्यावर राजकीय वरदहस्त असल्याने पोलीस त्याला अटक करायला धजावत नसल्यामुळे आणि तो घरी आढळून येत नसल्याचे पोलीस वारंवार सांगत असल्याने पीडित महिलेने या परिस्थितीत जीवन असह्य होत असल्यामुळे आपणावर आपल्या जीवाचे काही बरेवाईट करण्याची वेळ येऊ शकते असे पत्रच पोलीस आयुक्तांना लिहिले होते. त्यानंतरही धोंगडेपाटील न्यायालयात शरण येईपर्यंत पोलिसांना सापडलाच नाही.
दरम्यान धोंगडे याने अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा म्हणून आधी सत्र न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. परंतु, गुन्हा एवढा गंभीर होता की कोणत्याही न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला नाही. शेवटी निराश होऊन तो न्यायालयात शरण आला.
आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास धोंडगे एका वकिलामार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर झाला. न्यायालयात त्याच्यावतीने सांगण्यात आले की सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न करुनही त्याला जामीन न मिळाल्याने तो न्यायालयात शरण येत आहे. न्यायालयाने त्याला ताब्यात घेऊन ५ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या कालावधीत मुकुंदवाडी ठाण्याचे पोलीस अधिकारी न्यायालयात हजर होऊन त्याला पोलीस कोठडीसाठी आरोपीचा ताबा द्यावा अशी मागणी करु शकतात. त्यानंतर जेल वॉरंट काढले जाऊन त्याला न्यायालयात हजर करुन पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. बलात्कार, गर्भपात, पिस्तुलाची जप्ती, सोन्याचे दागिणे आणि रोख रकमेचा शोध आदी विविध कारणांसाठी पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते