‘कोरोना‘च्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृती दल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अजित पवार यांचा  पॉइंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्दा

नागपूर ,२१ डिसेंबर/ प्रतिनिधी :-चीनसह अन्य काही देशांत कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कृती दल गठित करून केंद्र सरकारबरोबर समन्वय ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या परिस्थितीवर राज्य शासन लक्ष ठेवून आहे. कृती दल गठित करून आणि केंद्र सरकारबरोबर समन्वय ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येईल.

अजित पवार यांचा  पॉइंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्दा

जपान, चीन, कोरिया, ब्राझील या देशांमध्ये कोरोनाचे नवे उपप्रकार सापडत आहेत. कोरोनाची साथ नव्याने आले असून चीनमध्ये गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. चीनमध्ये बेड कमी पडत असल्याने कारसारख्या वाहनांमध्ये रुग्णांना दाखल केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी कोरोनाच्या नव्या उपप्रकाराची तपासणी आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, असे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार म्हणाले.

आपण चीनमधील स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हायपावर कमिटी किंवा टास्क फोर्स तसेच जगभरात काय केले जात आहे याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमणार आहोत का? अशी विचारणा अजितदादांनी सभागृहात केली. तसेच कोरोनाच्या नव्या उपप्रकाराचा प्रसार होऊ नये यासाठी पक्ष बाजूला ठेवून, एकत्रित येत विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले.

कोरोना वाढल्यास संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये गेला होता याचा विसर पडू देऊ नका. सरकारनेही याबद्दल काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.