शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

शाळांमध्ये सीसीटीव्ही व कॅफेटेरिया परिसरात निर्बंध लावावेत-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

नागपूर ,२१ डिसेंबर/ प्रतिनिधी :-शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ वा तत्सम चित्रीकरण यांच्या प्रभावामुळे विकृत दृष्टिकोन निर्माण होणे व त्यातून लैंगिक अत्याचार अथवा हिंसेच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

मुंबईतील माटुंगा येथील महानगरपालिकेच्या शाळेतील तेरा वर्षीय विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत सदस्य उमा खापरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “माटुंगा येथील घटना चिंताजनक आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. अशा विकृतींना आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. सायबर गुन्ह्यांबाबत  संबंधित प्राप्त तक्रारीची तांत्रिक तपासणी करण्यासाठी राज्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांमध्ये अश्लील चित्रीकरणाच्या प्रभावामुळे विकृती वाढतेय. ही चिंताजनक बाब आहे. लैंगिक अत्याचारासंबंधी व्हिडिओ व अन्य मजकूर याबाबतची माहिती मिळाल्यावर समाजमाध्यम व वेबसाईटवरून हटवण्यासंबंधी त्वरित कारवाई करण्यात येत आहे. तसेच राज्यामध्ये इंटरनेटवरील अशा प्रकारच्या मजकुरावर आणि वेबसाईटवर प्रतिबंध घालण्याचे काम सुरु आहे. राज्यातील सायबर गुन्ह्यांबाबत सायबर इंटेलिजन्स युनिट प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे. यामाध्यमातून सायबर गुन्हेगारीवर वचक ठेवता येईल’’, असे श्री.फडणवीस यांनी उत्तरात सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “राज्यातील काही मोठ्या शाळा, महाविद्यालयामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र, काही साधारण शाळा, महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही  बसविण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात सूचना देण्यात येतील. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासंदर्भात चांगला, वाईट स्पर्श (good touch-bad touch) बाबत मार्गदर्शनपर प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शाळा, महाविद्यालय परिसरातील  कॅफेटेरिया व अन्य सुविधा यांचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आणि गृह विभागाच्या सचिवांची समिती नेमून एक स्वतंत्र धोरण ठरविण्यात येईल”, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

“राज्यात किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्यासाठी ‘पोलीस दिदी’ यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पोलीस दिदींची संख्या वाढविण्यात येत आहे. यात खासगी स्वयंसंस्थांचाही सहभाग घेत आहोत.  शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून शाळा प्रशासनास यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि गृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी बृहत कार्यक्रम हाती घेण्यात येईल”, असे श्री. फडणवीस म्हणाले.

शाळेच्या वाहनांवरील वाहनचालकांच्या नियुक्ती/ कामाबाबत लेखापरीक्षण (ऑडिट) करणे गरजेचे आहे. यासंदर्भात कायदे, नियम आणि संहिता आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी माहितीदेखील उपमुख्यमंत्री यांनी दिली.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री प्रविण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.

शाळांमध्ये सीसीटीव्ही व कॅफेटेरिया परिसरात निर्बंध लावावेत-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

नागपूर – शाळेत होत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शाळेत टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच शाळा महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेटेरियांवर निर्बंध लावावेत, अशी आग्रही मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

   अल्पवयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे व शाळेत सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहेत,त्याबाबत सरकारने काही उपाययोजना केल्यात का? तसेच अल्पवयीन मुलांच्या हातून लैंगिक गुन्ह्यांचे प्रकार समोर येत आहेत,त्यामुळे शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाबाबत जनजागृती करणं आवश्यक असून त्याबाबत सरकारने काहीउपाययोजना  केल्यात का असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. अकोला, बीड सारख्या जिल्ह्यात महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेटेरियामध्ये मुलींवर घडलेले प्रकार दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून यावर कठोर निर्बंध लावण्याची मागणी केली.

   त्यावर गृहमंत्री यांनी विनाअनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत सक्ती करण्याबाबत सूचना केली जाईल व शक्य असल्यास मदत दिली जाईल अशी ग्वाही दिली.तसेच अल्पवयीन मुलींना लैंगिक शिक्षणाबाबत गुड टच बॅड टचचे पोलीस दिदींकडून धडे देण्यात येत आहेत, अशी माहिती दिली. महाविद्यालय परिसरातील कॅफेटेरियावरील निर्बंध व शाळेतील सीसीटीव्ही लावण्याबाबत दोन सचिवांची कमिटी तयार करण्यात येईल,  असे आश्वासन गृहमंत्री यांनी दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर दिले.