अडीच महिन्याच्या लहान बाळाला घेऊन आमदार अधिवेशनाला; कोण आहेत सरोज अहिरे?

नागपूर ,१९ डिसेंबर/ प्रतिनिधी :-नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी नेहमी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांशिवाय आणखी एका कारणामुळे हा पहिला दिवस चर्चेत राहिला. ते कारण म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या बाळासह अधिवेशासाठी हजर राहिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे कौतुक केले. याबद्दल माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेऊन दोघांचीही चौकशी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “मी आई आहेच, सोबत आमदारही आहे. त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत.”

आमदार सरोज अहिरे म्हणाल्या की, “मी आई तर आहेच, शिवाय मी आमदारही आहे. त्यामुळे दोन्हीही कर्तव्ये माझ्यासाठी महत्त्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही. पण, मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत. म्हणून मला बाळाला घेऊन यावे लागले.” तर राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडली असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासू कल्पना वाघदेखील उपस्थित होत्या.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.

विधानसभा सदस्य सौ. अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या त्या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळासमवेत. याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार सौ. आहेर यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली.

विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर कौतुक केले. यावेळी आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ हे देखील उपस्थित होते.

कोण आहेत आमदार सरोज अहिरे-वाघ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे या नाशिकमधील देवळालीच्या आमदार आहेत. २०२१मध्ये त्यांचे लग्न डॉ.प्रवीण वाघ यांच्याशी झाले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवानेत्यांमध्ये त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मतदारसंघात जनेतशी नाळ असलेल्या आमदार म्हणून त्या ओळखल्या जातात.