समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना उपलब्ध –बी.पी.साळुंके

औरंगाबाद,१९ डिसेंबर / प्रतिनिधी :- हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान यांचे हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी झाला. त्यानंतर समृद्धी महामार्गावरुन दररोज सरासरी 10 ते 12 हजार वाहने प्रवास करत आहेत व दिवसेंदिवस ही संख्या वाढू शकते यामुळे महामार्गावरुन प्रवास करतांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केलेल्या आहेत. अपघातग्रस्तांना मदत, नियंत्रण कक्ष, इंधन सुविधा अपघातग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी इंटरचेंजवर 21 ठिकाणी सुसज्ज शीघ्र प्रतिसाद वाहने – QRV वाहने उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी.जी.साळुंके यांनी सांगितले आहे.

            या महामार्गावर अपघातग्रस्त वाहन द्रुतगती मार्गावरुन बाजूला नेण्यासाठी 13 ठिकाणी क्रेनची सोय केलेली आहे.अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एकूण 15 रुग्ण वाहिका आहेत. रुग्णवाहिका स्थानिक रुग्णालयांशी संलग्न ठेवण्यात आलेल्या आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरिता 108 क्रमांकावर संपर्क साधता येतो.सुरक्षेसाठी महामार्ग सुरक्षा पोलीस (Highway Safety Police) तैनात आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे (MSSC) एकूण 121 सुरक्षा रक्षक महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त केलेले आहेत. वाहनांचा बिघाड, अपघात झाल्यास 24 तास हेल्पलाईन क्रमांक 1800 233 2 233 व 81 81 81 81 55 कार्यरत असून सदर हेल्पलाईन क्रमांक महामार्गावर ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. प्रवासाला निघण्यापुर्वी आपल्या मोबाइल मध्ये सदर क्रमांक कृपया जतन करावेत. नागपूर ते शिर्डी दरम्यान समृद्धी महामार्गावर प्रत्येक इंटरचेंजच्या ठिकाणी स्वंतत्र नियंत्रण प्रणाली असून ते मुख्य नियंत्रण कक्षाशी संलग्न आहेत.

            औरंगाबादमधील सांवगी इंटरचेंज येथे मुख्य नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला असून नियंत्रण कक्षातून 24 तास सर्व सुविधा यंत्रणावर बारकाईने लक्ष दिले जाते.नागपूरहून शिर्डीच्या दिशेने 7 ठिकाणी तर शिर्डीहुन नागपूरच्या दिशेने जातांना 6 ठिकाणी अशा एकूण 13 ठिकाणी इंधन भरण्यासाठी पेट्रोल-डिझेल पंपची सोय करण्यात आली आहे. याच ठिकाणी प्रसाधनगृह, खानपान सेवा, टायर पंक्चर काढण्यासाठी व टायरमध्ये हवा भरण्यासाठी व वाहनांची किरकोळ दुरुस्तीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पथकर स्थानकांवर देखील प्रसाधन गृहांची सुविधा उपलब्ध आहे. 

            समृद्धी महामार्गावर 16 ठिकाणी महामार्ग सोयी सुविधा (Way side Amenities) सुरु करण्याची प्रक्रिया सुरु असून लवकरच प्रवाशांसाठी ती उपलब्ध करुन दिली जाईल. अतिवेगामुळे काही ठिकाणी अपघात झालेले असून, त्याअनुषंगाने सर्व जनतेस व वाहनधारकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाचे इंजिन, इलेक्ट्रीक वायरिंग, टायर्स इ. सुस्थितीत असण्याची खात्री करावी, वाहनाची गती विहित मर्यादित ठेवावी व लेनची शिस्त पाळावी, चूकीच्या बाजूने वाहने ओव्हरटेक करु नये, मुख्य मार्गिकेवर वाहने पार्क करु नये, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, सीट बेल्ट वापरणे इ. बाबींचे जाणीवपूर्वक व काळजीपूर्वक पालन करणे आवश्यक आहे. असे अवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी.पी.साळुंके यांनी केले आहे.