खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी आम्ही तडजोड होऊ देणार नाही !-उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई ,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :-महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी ते आपल्या भाषणात म्हणाले की, बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशानं पाहिला असेल. मोर्चाची घोषणा केली तेव्हा मला काहींनी विचारलं तुम्ही एवढे चालणार का? मी म्हटलं मी एकटा नाही, माझ्यासोबत लाखो महाराष्ट्रप्रेमी नुसतेच नाही, तर महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत.


पुढे ते म्हणाले, “आजवर आपल्याला ज्यांनी ज्यांनी डिवचलं, त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्यानंतर असं दृश्य सगळ्या जगानं पहिल्यांदा पाहिलं असेल. अजूनही बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कुणीही यायचं आणि डिवचून जायचं. आज सर्व पक्षांचे झेंडे इथे दिसतायत, ही महाराष्ट्राची ताकद आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो म्हणणारे तोतये आहेत. आमची खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी आम्ही तडजोड होऊ देणार नाही आणि असं जो कुणी करण्याचा प्रयत्न करेल, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. ” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंबद्दल हे बोलतायत. जर ते नसते, तर आज आपण कुठे असतो त्याचं एक उदाहरण आपल्या मंत्र्यांनी ‘भीक’ शब्द वापरून दाखवून दिलं आहे. त्या लोकांनी तेव्हा शेणमार, धोंडमार सहन केली पण ते डगमगले नाही. त्यांच्यामुळे आपण शाळेत गेलो. आपण तसे गेलो नसतो, तर आपणही यांच्यासारखे मंत्री बनून अशी शाब्दिक भीक मागत बसलो असतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे. शब्दांना काही अर्थ असतो की नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 “यांच्या मंत्रिमंडळात कसे मंत्री आहेत? एक तर बौद्धिक दारिद्र्य असणारे आहेत. दुसरे सुप्रिया सुळेंचा अपमान करणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार या लफंग्यांना नाहीये. हे लफंगे आहेत. महाराष्ट्र लुटायला आले आहेत. शिवाजी महाराजांनी मातेबद्दल, परस्त्रीबद्दल आदर कसा ठेवायचा याची शिकवण दिली आहे. तिसरे आपले मुंबईचे पालकमंत्री आहेत. त्यांनी तर आग्र्याहून महाराजांची सुटका झाली, त्यांची बरोबरी या खोकेवाल्यांशी केली आहे. कुठे तुम्ही, कुठे शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. आणि यांनी खोके घेऊन, लांडीलबाडी करून, पाठीत वार करून, तेही आपल्या राजकीय पक्षाच्या म्हणजे स्वत:च्या आईच्या पाठीत नव्हे, कुशीत वार करून सरकार स्थापन केलं, त्यांची तुलना तुम्ही शिवाजी महाराजांशी करताय? या गर्दीमुळे महाराष्ट्रद्रोह्यांचे डोळे उघडले पाहिजेत. जर ते उघडणार नसतील, तर ते कधीच उघडू नयेत, अशी आपण प्रार्थना करुयात. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

या इशाऱ्यातून राज्यकर्त्यांनी बोध घेतला नाही तर…पवारांचं खुलं आव्हान

महाविकास आघाडी तर्फे काढण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल’ महामोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सहभाग घेत उपस्थितांशी संवाद साधला.

आज आपण लाखोंच्या संख्येने इथे का जमलोय तर महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकत्रित आलोय. आज ज्यांच्या हाती राज्याची सूत्र आहेत त्या सत्तेत बसलेले लोक महाराष्ट्राच्या महापुरुषांबद्दल वेगळ्या प्रकारची भाषा वापरतात. देशात अनेक राजे रजवाडे होऊन गेले अनेकांची संस्थाने झाली पण साडेतीनशे वर्ष झाली तरी सामान्य माणसाच्या अंत:करणात एक नाव अखंड आहे ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपती महाराज. त्या शिवछत्रपतींबद्दल राज्याचा एखादा मंत्री, अन्य कोणी सत्ताधारी पक्षाचे घटक काही चुकीचे वक्तव्य करतात ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. या संबंधीची तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आज आपण लाखोंच्या संख्येने इथे जमलो. आज जो ईशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला त्यातून राज्यकर्त्यांनी बोध घेतला नाही तर लोकशाहीच्या मार्गाने त्यांना काय धडा शिकवायचा त्यासाठी महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, असा स्पष्ट इशारा पवार यांनी यावेळी दिला.

“मला आनंद आहे की, आज या ठिकाणी आपली विचारधारा वेगळी असेल. पण महाराष्ट्राच्या भल्यासाठी, सन्मानासाठी, स्वाभिमानासाठी हजारोंच्या संख्येने संयमाने आणि शिस्तीने तुम्ही या ठिकाणी आलात. माझी अशीच अपेक्षा आहे की, या मोर्च्यातून राजकर्ते धडा घेतील.” असं शरद पवार म्हणाले.

जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी-विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

महापुरुषांचा सन्मान, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्रवासियांचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी आपल्या राज्यात महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हा हल्लाबोल मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रप्रेमी आले त्या सर्वांचे अजितदादा पवार यांनी मनापासून स्वागात केले.

गेले सहा महिने राज्यात जे सरकार सत्तेत आले त्यामुळे दुर्दैवाने राज्याच्या मातीला फुटीचा, गद्दारीचे संकट जेव्हा महाराष्ट्रावर येते तेव्हा राज्याचा स्वाभिमान आणि अस्मितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठतो आणि आपले ध्येय साध्य केल्याशिवाय राज्य शांत बसत नाही याची साक्ष देणारा हा मोर्चा असल्याचे अजितदादा म्हणाले. खरतर ही वेळ राज्यावर का आली तर महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्य सातत्याने होत आहेत त्याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढावा लागला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, मौलाना आझाद अशा अनेक महापुरूषांची नावांची यादी आहे ज्यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम, बेताल वक्तव्य करण्याचे काम कशामुळे सुरू आहे, यामागील मास्टमाईंड कोण आहे, हे का थांबत नाही, असे अनेक सवाल त्यांनी राज्य सरकारला केले.

पुढे अजितदादा म्हणाले की, माणसाकडून चूक एकदा होऊ शकते, चूक झाल्यास माफी मागतो ही राज्याची संस्कृती आहे परंतु सत्ताधाऱ्यांमध्ये तसे घडत नाही. राज्यपाल काही बोलले की त्यांच्यापुढे त्यांचे मंत्री बेताल वक्तव्य करतात, अशा लोकांना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी, असे शब्दात अजितदादांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. तुम्ही राज्यकर्ते म्हणून बसले असताना संविधान, कायदा काय सांगतो हे पाहणे जरूरीचे असताना या सगळ्याचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे, असा आरोप त्यांनी केला. या सर्व विरोधात जितक्या मोठ्या संख्येने राज्यातील जनसमुदाय इथे अवतरला आहे त्यातून राज्यकर्त्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.

तसेच यावेळी महापुरुषांचा होणार अपमान पाहाता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना हटवले पाहिजे, या सोबत जे आमदार दोषी असतील त्यांनाही हटवले पाहिजे अशी मागणी अजितदादांनी केले. ही सर्व प्रवृत्तीची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी उद्याच्या अधिवेशनात वेळ पडल्यास कडक कायदा करावा अशी मागणी त्यांनी केली. अशाप्रकारच्या बिलाला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील असेही ते म्हणाले.

बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील ८६५ मराठी गावे राज्यात आणण्याचा संघर्ष सुरू असताना राज्यातील गाव कर्नाटकात जाण्यास का सुरुवात झाली याचा राज्यातील नागरिकांनी विचार करायला हवा. आम्ही सत्तेत असताना अशा पद्धतीने कधीही भूमिका सीमाभागातील गावांनी घेतली नाही. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र पूर्णपणे वेगळा आहे त्यामुळे हे का घडले आणि कुणामुळे घडले याची स्पष्टता व्हायला हवी असे ते म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटक बँकेत सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची भूमिका घेतात यावर अजितदादांनी राज्य सरकारला धारेवर धरले. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबद्दल अनेक वक्तव्य केली त्यावर राज्य सरकारला काही वाटायला हवे, कर्नाटक सरकार सातत्याने आपल्यावर अन्याय करतेय. तुमचे पुतण्या मावशीचे प्रेम हे सगळ्यांना कळाले आहे, अशी टीका अजितदादांनी केली.

आपल्याला इथेच थांबून चालणार नाही तर या सत्ताधाऱ्यांकडून सतत होणाऱ्या चुकीच्या निर्णयातून या सरकारला त्यांची जागा दाखवण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे आवाहन अजितदादांनी सर्व उपस्थितांना केले.