उद्यम सखी पोर्टलचा २९५२ महिलांनी घेतला लाभ

नवी दिल्ली : उद्यम सखी पोर्टलचा लाभ आतापर्यंत एकूण २९५२ महिलांनी घेतला आहे, त्यापैकी १७ महिला ओडिशा राज्यातील आहेत. उद्यम सखी पोर्टल हे पोर्टल मार्च २०१८ मध्ये विद्यमान/भावी महिला उद्योजकांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या आर्थिक योजना, धोरणे आणि कार्यक्रम यांची माहिती देण्यासाठी एमएसएमईद्वारे सुरू करण्यात आले आहे. हे पोर्टल महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यास, उभारण्यास आणि वाढविण्यास मदत करते.

उद्यम सखी पोर्टल कार्यरत करण्यासाठी ४३.५२ लाख रुपये खर्च करण्यात आले. उद्यम सखी पोर्टल हे इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेझरिंग इन्स्ट्रुमेंट्स (आयडीईएमआय) या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्थेने विकसित केले आहे.

उद्यम सखी पोर्टलवर अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, शहरी भाग आणि ग्रामीण भागातील महिला लाभार्थींच्या संख्येचा, वर्गवार डेटा प्रकाशित केला जात नाही. केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.