औरंगाबाद शहरात 11.81 टक्के लोकांमध्ये आढळली कोविड विरोधी प्रतिद्रव्ये

कोविड सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष जाहीर
कोविडवर मात करण्यासाठी लोकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक – जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण

औरंगाबाद, दि.24 :- औरंगाबाद शहरात दि. 10 ते 16 ऑगस्ट 2020 या कालावधीत करण्यात आलेल्या  कोविड सेरो सर्वेक्षणात 11.81 टक्के लोकांमध्ये कोविड विरोधी प्रतिद्रव्ये आढळून आली. या सर्वेक्षणामुळे शहरात कोविड रोगाची स्थिती कशी आहे, हे समोर आले असून या रोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी लोकांनी आता स्वंयशिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मास्कचा वापर, वारंवार साबणाने हात धुणे आणि सुरक्षित अंतर पाळणे, या त्रिसुत्रीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी शहरात करण्यात आलेल्या कोविड सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष जाहिर केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.  कानन येळीकर , डॉ. जगन्नाथ दिक्षित, महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, एमजीएम रुग्णालयाच्या डॉ. शोभा साळवे उपस्थित होत्या.

 कोविड सेरो सर्वेक्षणाबाबत सविस्तर माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, औरंगाबाद शहराच्या सर्व ११५ वार्ड मधून लोकसंख्येच्या प्रमाणात नमुने घेण्यात आले. त्यातील झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी भाग यांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आले. या सर्वेक्षणात १० ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचाही ३० क्लस्टर पध्दतीने अभ्यास करण्यात आला.या सर्वेक्षणातून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार औरंगाबाद मध्ये ११.८१% लोकांमध्ये कोविडविरोधी प्रतिद्रव्ये  आढळून आली.झोपडपट्टीतील लोकसंख्येत हे प्रमाण १४.५६% तर इतर लोकसंख्येत १०.६४% आहे. सिल्लेखाना-नूतन कॉलनी (वार्ड ६७), म्हाडा कॉलनी (वार्ड १०३), जुना बझार (वार्ड ४९), न्याय नगर (वार्ड ७९) आणि निझामगंज-संजयनगर (वार्ड ५६) या पाच वार्डा मध्ये सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे ६३.३%, ५४.५%, ५०%, ४३.६% आणि ३९.४% लोकांमध्ये कोविडविरोधी प्रतिद्रव्ये आढळून आली.

जय विश्व भारती कॉलनी (वार्ड ९९), विश्वास नगर (वार्ड ११), जवाहर कॉलनी-शास्त्री नगर (वार्ड ७७), संत ज्ञानेश्वर नगर (वार्ड ३०) आणि जटवाडा रोड (वार्ड ४) या पाच वार्डा मध्ये सर्वात कमी म्हणजे शून्य टक्के लोकांमध्ये कोविडविरोधी प्रतिद्रव्ये  आढळून आली. स्त्रीपुरुष आणि विविध वयो गटांमध्ये कोविडविरोधी प्रतिद्रव्ये जवळपास सारख्याच प्रमाणात आढळून आली. कोविडविरोधी प्रतिद्रव्ये  आढळून आलेल्या ८१% लोकांनी कोविड रुग्णांचा प्रत्यक्ष संपर्क न आल्याचे सांगितले. १२% लोकांना त्याविषयी माहिती नव्हती तर फक्त ७% लोकांनी तसा संपर्क आल्याचे सांगितले. स्वाब तपासणी होकारार्थी आलेल्या ५६ पैकी २२ व्यक्तींमध्ये कोविडविरोधी प्रतिद्रव्ये आढळून आली. तर स्वाब तपासणी नकारार्थी आलेल्या १६.६६% व्यक्तींमध्ये कोविडविरोधी प्रतिद्रव्ये  आढळून आली. लहान मुलांमधील (वय १० ते १७ वर्षे)  ८.६% मुलांमध्ये कोविडविरोधी प्रतिद्रव्ये  आढळून आली,असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, हे सर्वेक्षण संपूर्ण शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसंख्येत केलेले असल्याने असे म्हणता येते की कोविड रोगाचे सामाजिक संक्रमण होत आहे आणि त्यामुळे यापुढे सार्वजनिक आरोग्य उपाय योजना म्हणून लॉकडाऊन सारख्या उपायांचा फारसा उपयोग होणार नाही. मात्र मास्क वापरणे, वारंवार साबण-पाण्याने हात स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे ह्या उपायांची कडक अमलबजावणी आवश्यक आहे. दरम्यान, कोविड रोगाची साथ हळू हळू कमी होत असल्याचे या सर्वेक्षणातून दिसत आहे पण ती लक्षणीय दृष्ट्या कमी होण्यासाठी अजून काही महिने लागण्याची शक्यता आहे. अजून काही दिवसांनी असे सेरो सर्वेक्षण परत केल्यास त्याविषयी खात्रीने काही निष्कर्ष काढता येतील. काही भागांमध्ये जरी बऱ्याच लोकांमध्ये कोविडविरोधी प्रतिद्रव्ये आढळून आली असली तरी सर्व शहरवासियांनी गाफील राहून चालणार नाही.

औरंगाबाद शहरात दिनांक १० ते १६ ऑगस्ट दरम्यान कोविड सेरो सर्वेक्षण करण्यात आले. यात अनेक संस्थांनी मोलाचे योगदान दिले. औरंगाबाद चे माजी जिल्हाधिकारी श्री.उदय चौधरी, सध्याचे जिल्हाधिकारी श्री.सुनील चव्हाण, औरंगाबाद महानगर पालिकेचे आयुक्त श्री.आस्तिक कुमार पांडे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.काननबाला येळीकर, महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ.प्रवीण सूर्यवंशी तसेच भारतीय जैन संघटना या सर्वांच्या मार्गदर्शना खाली आणि सहाय्याने हा उपक्रम पार पाडण्यात आला.

सेरो सर्वेक्षणाच्या शास्त्रीय अभ्यासाची जबाबदारी मुख्य संशोधक, घाटीच्या जन औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या बरोबर सह संशोधक डॉ.ज्योती बजाज, डॉ.स्मिता अंदूरकर, डॉ.मोहम्मद घोडके , डॉ.श्रुती गायकवाड,  औरंगाबाद महानगर पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.मुजीब सय्यद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ, एम जी.एम.च्या डॉ.शोभा साळवे, या सर्वांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *