‘नॅक’ परिषदेकडून विनायकराव पाटील महाविद्यालयास ‘अ’ दर्जा

देशातील 472 शैक्षणिक संस्थांमध्ये महाविद्यालयाची वर्णी

वैजापूर,१४ डिसेंबर / प्रतिनिधी :-राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रत्यायन परिषद (नॅक)  कडून वैजापूर शहरातील विनायकराव पाटील महाविद्यालयाचे ता.8 व 9 डिसेंबर रोजी मुल्यांकन करुन महाविद्यालयास ‘ अ’ दर्जा प्रदान केला आहे  देशातील 472 शैक्षणिक  संस्थांमध्ये ग्रामीण भागातील या  महाविद्यालयाचा समावेश झाला असून सर्वत्र महाविद्यालयाचे कौतुक केले जात आहे.  

नॅक समितीने  महाविद्यालयातील ग्रंथालयाचे झालेले  संपूर्ण संगणकीकरण, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे नेत्रदीपक यश, स्पर्धा परीक्षा केंद्र, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ( आयक्युएसी) विभागाची उत्कृष्ट समन्वयाची भूमिका, महाविद्यालयाचा निसर्गरम्य परिसर,कोरोना महामारी काळातील महाविद्यालयाकडून राबविण्यात आलेले विविध  सामाजिक दायित्वाचे  उपक्रम, बदलत्या काळानुसार अध्ययन अध्यापन पद्धती नुसार ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा यशस्वी वापर तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त परामर्ष आणि स्ट्राइड योजनांना महाविद्यालयाने दिलेली गती या विविध महाविद्यालयाच्या बाबींवर नॅक समितीने प्रोत्साहन दिल्याचे आपल्या अहवालात नमूद केले.

———————————————————

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्याची मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची परंपरा विनायकराव पाटील महाविद्यालयाने सातत्याने जपली आहे. महाविद्यालयास ‘अ’ दर्जा मिळणे ही त्याचीच परिणती आहे अशी प्रतिक्रिया आमदार सतीश चव्हाण ( सरचिटणीस- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद) यांनी दिली. 

———————————————

महाविद्यालयाच्या या सर्व बाबींच्या आधारे  महाविद्यालयास  ‘ अ’ दर्जा मिळाला व  देशातील नामवंत 472 शैक्षणिक संस्थात महाविद्यालयाचा सामावेश  झाल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे.महाविद्यालयाच्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्र्यंबकराव पाथ्रीकर, महाविद्यालय विकास समिती प्रमुख कृषीभूषण अप्पासाहेब पाटील ॲड. प्रमोद दादा जगताप, ॲड देवदत्त पवार, उल्हास ठोंबरे, काशिनाथ गायकवाड, दिलीप बोरणारे, आनंदीबाई अन्नदाते, डॉ निलेश भाटिया यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य तथा आयक्युएसी समन्वयक डॉ. दादासाहेब साळुंके, उपप्राचार्य डॉ. संदीप परदेशी, रजिस्ट्रार विजय आहेर आदींनी  अभिनंदन केले आहे.

नॅक कडून महाविद्यालयास  ‘अ’ दर्जा मिळणे हा महाविद्यालयाच्या लौकिकात भर घालणारा असून सर्वांच्याच  सहकार्याने हे यश मिळाले आहे अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉ शिवाजीराव थोरे यांनी दिली.