शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; सिल्वर ओकवर आला फोन

मुंबई ,१३ डिसेंबर / प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर फोन करुन धमकी दिली. त्या व्यक्तीने हिंदी भाषेतून ‘देशी कट्ट्याने ठार मारू’ अशी धमकी दिली. यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत असून तपस सुरु केला आहे. त्यांनी या फोनचे लोकेशन ट्रेसदेखील केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती हा बिहारचा असून, त्याने यापूर्वी देखील एकदा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

शरद पवारांना मिळालेल्या धमकीनंतर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपस सुरु आहे. त्या अज्ञाताविरोधात २९४ आणि ५०६ (२) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कालच महाराष्ट्रभर त्यांचा ८२वा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. यानंतर आलेल्या धमकीच्या फोनने एकच खळबळ उडाली.