माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा समर्थकांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

मुंबई येथे बुधवारी प्रवेश सोहळा

वैजापूर तालुक्यात राजकीय समीकरण बदलणार 

जफर ए.खान 

वैजापूर, १३ डिसेंबर :- जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब पाटील ठोंबरे व त्यांचे पुतणे जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्यामुळे नाराज असलेले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. समर्थकांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून बुधवारी (ता.14) सकाळी मुंबईत मातोश्रीवर पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे. चिकटगांवकर यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व त्यांच्या समर्थकांचा विरोध असूनही पक्षश्रेष्टींनी ठोंबरे काका – पुतण्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्याने माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी नाराजी व्यक्त करून सर्व पर्याय खुले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर त्यांनी संपूर्ण तालुक्यात संपर्क दौरा आयोजित करून पुढे काय करावे पक्ष सोडावा की नाही ?  पक्ष सोडल्यास कोणत्या पक्षात प्रवेश घ्यावा.  यासंदर्भात कार्यकर्ते व समर्थकांची मते जाणून घेतली. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये प्रवेश घ्यावा असे मत या दौऱ्यात व्यक्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे माजी आमदार चिकटगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.तसेच लवकरच ते आपल्या समर्थकांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश घेणार असल्याचे बोलले जात होते. 

दरम्यान विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे आ.अंबादास दानवे व  सहसंपर्कपदी नियुक्ती झाल्याबद्दल जेष्टनेते  आसाराम पाटील रोठे यांचा माजी आमदार चिकटगावकर यांनी सत्कार केला व त्यांच्याशी प्रवेशासंदर्भात चर्चा केली. त्यामुळे त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश निश्चित मानला जात होता.

अखेर चिकटगांवकर यांच्या प्रवेशाला मुहूर्त सापडला असून बुधवारी (ता.14) मुंबई येथे मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते आपल्या समर्थकांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेणार आहेत.