महापुरुषांबद्दल जाणीवपूर्वक अपमानकारक वक्तव्य वैजापूर येथे पुतळा जाळून जाहीर निषेध

वैजापूर, १०डिसेंबर / प्रतिनिधी :-फुले-शाहू-आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांविषयी जाणीवपूर्वक अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे जेष्टनेते चंद्रकांत पाटील व आ.प्रसाद लाड यांच्या पुतळ्याचे दहन करून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा शनिवारी (ता.10) वैजापूर येथे जाहीर निषेध  करण्यात आला.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आज सकाळी भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बागुल, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष बाळू त्रिभुवन, सोशल फोरमचे प्रवीण खाजेकर,बहुजन समाज पार्टीचे ऋषिकेश त्रिभुवन, शकील शेख आदींनी पुतळ्याचे दहन करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे जेष्टनेते चंद्रकांत पाटील आणि आ.प्रसाद लाड यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.

उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपचे जेष्टनेते चंद्रकांत पाटील व आ.प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले-शाहू- आंबेडकर या महापुरुषांबद्दल जाणीवपूर्वक  अपमानकारक वक्तव्य करून महाराष्ट्रातील बहुजन – मराठा समाजसह तमाम जनतेची मने दुखवली आहे.  महापुरुषांविषयी जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्या मनुवादी विचारांच्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी.