कर्नाटक प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री गप्प का ? संजय राऊतांचा सवाल

मुंबई ,१० डिसेंबर / प्रतिनिधी :- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न दिवसेंदिवस अधिक तापत चालला आहे. त्यावर राज्यातील विरोधी पक्ष आक्रमकपणे बोलताना दिसत आहे. मात्र, सत्ताधारी याबाबत अजून मौन बाळगून आहेत. अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री थेटपणे त्यांची भूमिका मांडत आहेत मात्र आमचे मुख्यमंत्री आहेत कुठे ? ते याविषयावर काही बोलत का नाहीत ? त्यांच्या तोंडाला कोणी कुलूप लावले आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे सर्व खासदार काल अमित शहा यांना कर्नाटकच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी भेटले मात्र, मिंधे सरकार अजून गप्पच आहे असा सवाल संजय राऊत यांनी केला.

कर्नाटक – महाराष्ट्र  सीमावादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे मौन का, असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. ‘कालही महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. मात्र, शिंदे गटाचे पळपुटे खासदार संसदेत गप्प का?, मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घ्यावी अशी अपेक्षा, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.संजय राऊत म्हणाले, पळकुटे खासदार गप्प राहिलेत, अमित शाह काय मध्यस्ती करणार?, हे त्यांनी स्पष्ट सांगावं. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असे सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी काय भूमिका घेतली आणि ते शाह काय मध्यस्ती करणार आहेत, ते त्यांनी सांगितले पाहिजे. मध्यस्ती करणार म्हणजे नक्की काय करणार, असे काही सांगितलेले नाही, असे राऊत म्हणाले.