एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासाठी शासनाकडून २०० कोटी मंजूर:एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक

मुंबई ,९ डिसेंबर / प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांना वेतन देण्यासाठी फक्त २०० कोटींची निधी देणे ही शुद्ध फसवणूक असून हा निव्वळ ठिगळे लावण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

एसटी महामंडळाने वेतनासाठी ७९० कोटी रुपये इतक्या निधीची मागणी शासनाकडे केली होती. पण त्यापैकी फक्त रु. २००कोटी इतकी कमी रक्कम महामंडळाला सरकारने दिली आहे. ही रक्कम अपुरी आहे. महिन्याला वेतनासाठी ३६० कोटी रुपये इतका निधी हवा आहे. त्यामुळे या निधी मध्ये भविष्य निर्वाह निधी, उपदान, बँक कर्ज, एल आय सी, व इतर देणी कपात केली जाणार नाहीत. ही देणी प्रलंबित राहणार आहेत. त्यामुळे यावर कर्मचारी समाधानी नाहीत. या रकमेमध्ये नक्त वेतन सुद्धा देता येत नाही. वेतनासाठी २०५ कोटी रुपये इतका निधी लागत आहे.

मुळात संप काळात उच्च न्यायालयात सरकारने वेतनासाठी लागणारी पूर्ण रक्कम एसटी महामंडळाला दिली जाईल असे सांगितले आहे. पण त्या नंतर फक्त दोन महिने पूर्ण रक्कम देण्यात आली. नवे सरकार आल्यापासून एकदाही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. हा न्यायालयाचा अवमान असून या संदर्भात लवकरच अवमान याचिका दाखल केली जाईल असेही बरगे यांनी म्हंटले आहे.