हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार; ऑपरेशन लोटसची भीती

घोडेबाजार रोखण्यासाठी आमदारांना अज्ञातस्थळी हलवणार

शिमला : हिमाचल प्रदेशात काँग्रेसने आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली असून त्यांचे उमदेवार ३८ जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपची २७ जागांपर्यंत खाली घसरण झाली आहे. हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. दोन्ही पक्ष अवघ्या काही मतांनी मागेपुढे आहेत.

हिमाचल प्रदेशात बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता आहे. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसला हिमाचल प्रदेशात सत्ता स्थापन करणे शक्य आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे.त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास भाजपने अपक्षांना गळाला लावण्याच्या तयारी केली होती. मात्र, आता काँग्रेसने सरशी साधल्यामुळे भाजपकडून आता हिमाचल प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’ राबवले जाण्याची शक्यता आहे.

घोडेबाजार रोखण्यासाठी आमदारांना अज्ञातस्थळी हलवणार

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी भाजपकडून घोडेबाजार होण्याच्या भितीने काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना पक्ष मुख्यालयात येण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना राज्याबाहेर शिफ्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षश्रेष्ठींनी छत्तीगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल व हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांची हिमाचलच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. हे दोन्ही नेते लवकरच शिमला गाठणार आहेत. त्यांच्यासोबत हिमाचलचे काँग्रेस प्रभारी राजीव शुक्लाही शिमल्याला जाणार आहेत. काँग्रेस आपल्या आमदारांना भाजपपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना राज्याबाहेर हलवण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार या आमदारांना छत्तीसगड किंवा राजस्थानात पाठवण्यात येईल, अशी शक्यता आहे. काँग्रेस आपल्या आमदारांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवून आहे.

काँग्रेस सरचिटणीस विक्रमादित्य सिंह म्हणाले, ‘‘राज्यात काँग्रेसच सरकार स्थापन करेल. भाजप गडबड पार्टी आहे. पण, आम्ही चुकांतून खूप काही शिकलो. प्रतिभा सिंह मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत. त्यावर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चर्चा होईल, पण यासंबंधीचा कोणताही निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. मुख्यमंत्री भूपेश बघेल थोड्याच वेळात रायपूरहून चंदीगडला रवाना होतील. विमानतळावरून ते थेट हॉटेल रॅडिसनला जातील. तिथे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत हिमाचलमधील आगामी रणनीतीवर चर्चा करतील. तसेच गरज भासली तर ते आजच शिमल्याला रवाना होतील. तिथे त्यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाला एकजूट ठेवण्याचे काम करावे लागेल. राजीव शुक्ला व दुसऱ्या प्रमुख नेत्यांनीही दिल्लीत पूर्वीपासूनच मोर्चा सांभाळला आहे.