नांदूरढोक येथे पोलिसांनी गुटखा पकडला ; 46 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

वैजापूर, ८ डिसेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नांदूरढोक येथे गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यास पकडून पोलिसांनी त्याच्याकडून 46 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी एकाविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमनाथ अंबादास शेळके (रा.वॉर्ड क्रमांक -1 गोंधवणी ता.श्रीरामपूर जि. अहमदनगर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी एकजण मोटारसायकलीवरून तालुक्यातील नांदूरढोक येथे गुटख्याची अवैध वाहतूक करणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शरद रोडगे यांना मिळाली. त्यानुसार सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. थोड्याच वेळात  गुटखा विक्रेता पोलिसांना  मोटारसायकलने पांढऱ्या रंगाची गोणी घेऊन त्या ठिकाणी आला. त्याला अडवून पोलिसांनी गोणीतील मालाबाबत चौकशी केली असता गोणीत गुटखा असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून 16 हजार 500 रुपयांचा गुटखा व 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण 46 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ शेळके यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.