अमृत काळाच्या प्रवासात आपली लोकशाही, आपली संसद आणि आपली संसदीय प्रणाली मोलाची भूमिका बजावेल- पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास

संसदेच्या हिवाळी सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी राज्यसभेला संबोधित केले

नवी दिल्ली,७ डिसेंबर /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या हिवाळी सत्राच्या सुरुवातीला राज्यसभेला संबोधित केले आणि उपराष्ट्रपतींचे वरिष्ठ सभागृहात स्वागत केले.

भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांचे संसदेच्या सर्व सदस्यांच्या तसेच देशातील सर्व नागरिकांच्या वतीने अभिनंदन करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. देशाच्या उपराष्ट्रपतीच्या प्रतिष्ठित पदाचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की हे पद लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे.

राज्यसभा अध्यक्षांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी आजच्या सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त आनंद व्यक्त केला आणि सदनाच्या सर्व सदस्यांच्या वतीने सशस्त्र दलांना अभिवादन केले. उपराष्ट्रपतींचे जन्मस्थान असलेल्या झुंझुनूचा उल्लेख करून, पंतप्रधानांनी देश सेवेसाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या झुंझुनू इथल्या असंख्य कुटुंबांच्या योगदानाचा उल्लेख केला. उपराष्ट्रपतींचे जवान आणि किसान यांच्याशी असलेले जवळचे संबंध त्यांनी अधोरेखित केले आणि म्हणाले, “आपले उपराष्ट्रपती किसान पुत्र आहेत आणि ते सैनिकी शाळेत शिकले आहेत, त्यामुळे त्यांचं जवान आणि किसान यांच्याशी जवळचं नातं आहे.”    

भारत दोन महत्वाच्या घटनांचा साक्षीदार होत असताना संसदेचे सन्माननीय वरिष्ठ सभागृह उपराष्ट्रपतींचे स्वागत करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारताने स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश केला आहे आणि जी-20 परिषदेच्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठेची संधी देखील भारताला मिळाली आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की, आगामी काळात नव्या भारतासाठी विकासाचे नवे पर्व सुरू करण्याबरोबरच जगाची दिशा ठरवण्यामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावेल. “अमृत काळाच्या प्रवासात आपली लोकशाही, आपली संसद आणि आपली संसदीय प्रणाली मोलाची भूमिका बजावेल”, ते पुढे म्हणाले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राज्यसभेचे सभापती म्हणून कारकिर्दीची औपचारिक सुरूवात आज होत आहे, ही बाब अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, वरिष्ठ सभागृहाच्या खांद्यावर  ज्या जबाबदाऱ्या निर्धारित केल्या आहेत, त्या सामान्य माणसांना जे मुद्दे चिंताजनक वाटतात, त्यांच्याशी निगडित आहेत. भारताला आपली जबाबदारी समजते आणि तो ती चांगल्या प्रकारे पार पाडतो, असे त्यांनी पुढे म्हटले.  या महत्वाच्या कालखंडात भारतातील प्रतिष्ठित आदिवासी समाज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात देशाला मार्गदर्शन करत आहे, याकडेही पंतप्रधानांनी दिशानिर्देश केला. तसेच अत्यंत उपेक्षित समाजातून वर आलेले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचल्याच्या बाबीवरही त्यांनी प्रकाश टाकला.

राज्यसभेच्या सभापतींबाबत परम आदरपूर्वक बोलताना, पंतप्रधान म्हणाले की, केवळ साधनसंपत्ती भरपूर असली तर काही साध्य करता येत नाही तर सातत्यपूर्ण सराव आणि वास्तवाची अनुभूती यातूनच यश साध्य करता येते, याचा पुरावा म्हणजे तुमचे आजचे आयुष्य आहे.  तीन दशकांहून अधिक काळपर्यंत  वरिष्ठ वकील म्हणून उपराष्ट्रपतींच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकताना पंतप्रधान गमतीच्या सुरात म्हणाले की, त्यांना सभागृहातही न्यायालयात असल्यासारखेच वाटेल कारण राज्यसभेत असलेले बरेच लोक त्यांना सर्वोच्च न्यायालयात भेटत असत. ते पुढे म्हणाले की, तुम्ही आमदारापासून ते खासदारापर्यंत, केंद्रीय मंत्री ते राज्यपाल अशा सर्व भूमिका निभावल्या आहेत. या सर्व भूमिकांमध्ये एक समानता, एक सातत्य आहे आणि ते  म्हणजे देशाचा  विकास आणि लोकशाही मूल्यांच्या प्रति समर्पण भावना. उपराष्ट्रपतींपदाच्या निवडणुकीत त्यांना 75 टक्के मते मिळाली, प्रत्येकाला त्यांच्याबद्दल किती ममत्व वाटते, याचाच तो पुरावा होता, याचेही पंतप्रधानांनी स्मरण करून दिले. पंतप्रधानांनी पुढे म्हटले की, कोणत्याही गोष्टीत स्वतः पुढे राहून कार्य करणे ही नेतृत्वाची खरी व्याख्या आहे आणि राज्यसभेच्या संदर्भात तर ती जास्तच महत्वाची आहे कारण  लोकशाही मूल्ये जपणारे निर्णय अधिक शास्त्रशुद्ध मार्गाने पुढे नेणे ही राज्यसभेची जबाबदारी आहे.

सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळून ती आणखी वाढवण्याची जबाबदारी राज्यसभा सदस्यांवर निश्चित केली असल्याच्या रोखाने पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या उत्तुंग अशा लोकशाही वारशाचे जतन करणारे वरिष्ठ सभागृह आहे आणि तीच त्याची ताकदही राहिली आहे. अनेक माजी पंतप्रधानांनी केव्हा नं केव्हा राज्यसभा सदस्य म्हणून देशाची सेवा केली आहे, यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. पंतप्रधानांनी सदस्यांना असे आश्वासन दिले की, उपराष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली हे सभागृह आपली परंपरा आणि प्रतिष्ठा आणखी उंचीवर घेऊन जाईल. सदनात लोकशाही मार्गाने झालेली गंभीर चर्चा  लोकशाहीची जननी म्हणून असलेल्या आमच्या अभिमानाला आणखी पाठबळ देईल, असे पंतप्रधान म्हणाले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, गेल्या सत्रात माजी उपराष्ट्रपती आणि माजी अध्यक्षांनी वापरलेले वाक्प्रचार आणि खुसखुशीत कविता या सदस्यांसाठी आनंद आणि हास्याची खसखस पिकवणाऱ्या स्त्रोत ठरल्या होत्या, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. मला खात्री आहे की तुमचीही शीघ्र विनोदबुद्धी ती उणीव राहू देणार नाही आणि तुम्हीही सभागृहाला तो आनंददायक अनुभव देत रहाल, या शब्दांत पंतप्रधानांनी समारोप केला.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. आपण 15 ऑगस्ट पूर्वी भेटलो होतो, त्यामुळे हे सत्र महत्वाचं आहे. 15 ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता आपण सर्वजण अमृतकाळाच्या यात्रेत पुढे निघालो आहोत. आज आपण अशा वेळी भेटलो आहोत, जेव्हा देशाला, आपल्या भारताला जी-20 च्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला आहे. जागतिक समुदायात ज्या प्रकारे भारताचं स्थान निर्माण झालं आहे, ज्याप्रकारे भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत आणि ज्याप्रकारे भारत जागतिक स्तरावर आपला सहभाग वाढवत आहे, अशा वेळी हे जी-20 चं अध्यक्षपद भारताला मिळणं ही एक खूप मोठी संधी आहे.

ही जी-20 परिषद म्हणजे केवळ एक राजनैतिक कार्यक्रम नाही, तर ही जी-20 परिषद भारताचं सामर्थ्य जगासमोर पूर्णपणे प्रदर्शित करण्याची संधी आहे. एवढा मोठा देश, लोकशाहीची जननी, एवढी विविधता, एवढं सामर्थ्य असलेल्या भारताला संपूर्ण जगाने जाणून घेण्याची एक खूप मोठी संधी आहे, आणि भारताला आपलं सामर्थ्य संपूर्ण जगासमोर दाखवण्याचीही खूप मोठी संधी आहे.   

गेल्या काही दिवसांत, सर्व पक्षांच्या अध्यक्षांबरोबर माझी अत्यंत अनुकूल वातावरणात चर्चा झाली आहे. सभागृहातही त्याचं प्रतिबिंब नक्कीच दिसून येईल. सदनातूनही तोच स्वर निनादेल, जो जगासमोर भारताचं सामर्थ्य जगासमोर आणण्यास उपयोगी ठरेल. या सत्रात देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी वर्तमानातल्या जागतिक परिस्थितीत, भारताला पुढे जाण्यासाठीचा  नव्या संधी लक्षात घेऊन अनेक महत्वाचे निर्णय या सत्रात घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मला विश्वास आहे की सर्व राजकीय पक्ष चर्चेमध्ये मोलाची भर घालतील, आपल्या विचारांनी निर्णयांना नवीन बळ देतील, दिशा अधिक स्पष्टपणे निश्चित करायला मदत करतील. संसदेच्या या सत्राचा जो कार्यकाळ शिल्लक आहे, सर्व पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यरत असलेल्या सर्व नेत्यांना मी विनंती करू इच्छितो की, जे पहिल्यांदाच संसदेत आले आहे, जे नवीन खासदार आहेत, जे युवा खासदार आहेत, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि लोकशाहीची भावी पिढी तयार करण्यासाठी आपण त्या सर्वांना जास्तीत जास्त संधी देऊ, चर्चांमध्ये त्यांचा सहभाग वाढवा.

गेल्या काही दिवसांपासून सर्व पक्षांच्याच कोणत्या ना कोणत्या खासदाराशी माझी  जेव्हा जेव्हा अनौपचारिक चर्चा जेव्हा झाली आहे, तेव्हा सर्व खासदार एकच बाब मला सांगतात, सभागृहात प्रचंड गोंधळ होतो आणि मग सभागृहाचं कामकाज स्थगित होते. त्यामुळे आम्हा खासदारांचे खूपच नुकसान होते. युवा खासदारांचे असे म्हणणे आहे की, सभागृहाचे कामकाज होत नसल्याने तसेच चर्चाच होत नसल्याने इथे आम्हाला जे शिकायचे आहे, जे समजून घ्यायचे आहे, ते मिळतच नाही. कारण ही संसद म्हणजे लोकशाहीचे सर्वात मोठे विद्यापीठ आहे. त्या शिक्षणापासून आम्ही वंचितच रहातो. आम्हाला ते सद्भाग्य मिळत नाही आणि म्हणून सभागृहाचे कामकाज चालणे अत्यंत आवश्यक आहे. असाच सुर सर्वच पक्षांच्या युवा खासदारांकडून व्यक्त झालेला दिसतो.

मला असं वाटतं की विरोधी पक्षांच्या खासदारांचेही असेच म्हणणे आहे की चर्चेत आम्हाला बोलण्याची संधी मिळत नाही.गदारोळ होतो, सभागृहाचे कामकाज तहकूब होते, प्रचंड गोंधळ होतो आणि आमचे खूप नुकसान होते. मला असे वाटते की सर्व सभागृह नेते, सर्व पक्षांचे नेते हे आमच्या या खासदारांची वेदना समजून घेतील. त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी स्वतःचे सामर्थ्य कारणी लावण्याचा त्यांच्यात जो उत्साह आहे, जी उमेद आहे, त्यांचा जो अनुभव आहे, त्या सर्वांचा लाभ देशाला मिळावा. निर्णयप्रक्रियेला मिळावा, निर्णयांमध्ये त्याचा लाभ मिळावा, हे लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मी सर्व राजकीय पक्ष,  सर्व खासदारांना असा आग्रहपूर्वक सांगेन की, हे अधिवेशनाचे सत्र जास्तीत जास्त कार्यक्षम आणि फलदायी बनवण्यासाठी  सामूहिक प्रयत्न व्हावेत.

या अधिवेशनात, आणखी एक सद्भाग्य आम्हाला लाभले आहे आणि ते म्हणजे आज प्रथमच आमचे उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती या नात्याने आपला कार्यकाल सुरू करणार आहेत. त्यांच्यासाठी हे पहिलेच सत्र  आहे आणि हा त्यांचा पहिलाच दिवस आहे. ज्याप्रकारे आमच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताची महान परंपरा, आमच्या आदिवासी परंपरांसहित देशाचा गौरव वाढवण्यात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, त्याचप्रकारे शेतकऱ्याचा पुत्र आज देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर आहे आणि आज राज्यसभेचे सभापती या नात्याने ते देशाचा लौकिक आणखी पुढे नेतील, खासदारांना प्रेरित करतील आणि प्रोत्साहन देतील. त्यांनाही माझ्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो.