…तर संजय राऊतांना फटकवणार-शंभूराज देसाईंचा उघड इशारा!

पवारांच्या नेतृत्वात बेळगावला जाणार? संजय राऊतांनी नेतृत्व बदललं का?

मुंबई ,७ डिसेंबर / प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या सरकारला संजय राऊत यांनी षंड असे संबोधल्याच्या मुद्द्यावर मंत्री शंभुराज देसाई चांगलेच संतापले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांनी जर अशी विधाने थांबवली नाहीत तर आमची दोन हात करण्याचीही तयारी आहे, असा उघड इशारा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र सरकारबाबत संजय राऊत यांनी नाहक वक्तव्य केली आहेत. त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीरपणे धिक्कार करतो, असे म्हणत शंभुराज देसाई यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

जशास तसे उत्तर देणार

“छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली जी तुकडी बेळगावला गेली होती. त्यात एकनाथ शिंदे देखील होते. ४० दिवस त्यांना तुरुंगात राहावे लागले होते. पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या होत्या. त्यामुळे सीमावादावरुन चार तासही तुरुंगात न राहिलेल्या राऊतांना एकनाथ शिंदेंवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. संजय राऊतांनी यापुढे बडबड जर बंद केली नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत वेडेवाकडे बोलणे थांबवले नाही तर जशास तसे उत्तर शिंदे साहेबांचे सैनिक दिल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर बोलणे थांबवावे, आमची मंत्रीपदं, नेतेपद राहिली बाजूला पण शिंदे साहेबांबद्दल पुन्हा खालच्या पातळीवर जाऊन संजय राऊत बोलले तर त्यांच्याशी दोन हात करण्याची आमची पण तयारी आहे”, असे शंभूराज देसाई म्हणाले.

संजय राऊत स्वत: कोण आहेत हे त्यांनी एकदा तपासून पाहावे

“सीमावादावर केंद्राने लक्ष द्यावे. दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधून महाराष्ट्राची बाजू कशी भक्कम आहे हे सांगण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळोवेळी करत आहेत. असे असताना षंड हा शब्द संजय राऊत यांनी आमच्या सरकारवर आणि आमच्यासाठी वापरला. संजय राऊत स्वत: कोण आहेत हे त्यांनी एकदा तपासून पाहावे. कारण ज्यांना १५ दिवसांपूर्वी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे समन्स कर्नाटकच्या कोर्टाने धाडले ते सुद्धा पूर्ण करण्याचे धाडस राऊतांकडे नाही. न्यायालयाचे कवच असताना सुद्धा ते तिथे जात नाहीत, अशांनी आम्हाला षंड बोलू नये”, असे शंभूराज देसाई म्हणाले.

“संजय राऊत तुम्ही साडे तीन महिने आराम करून आला आहात. तुम्हाला बाहेरचे वातावरण सूट होत नाहीत. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये त्यामुळे अशी वक्तव्य टाळावीत”, अशा शब्दात शंभूराज देसाईंनी राऊत यांना इशारा दिला आहे.

आमच्यामुळे संजय राऊत खासदार

“एकनाथ शिंदेंच्या एका शब्दामुळे संजय राऊत आज खासदार आहेत. आम्ही जर शिंदे साहेबांचे ऐकले नसते तर संजय राऊतांच्या नावापुढे आज माजी खासदार असे असते. आमच्या ५० आमदारांच्या मतावर संजय राऊत खासदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे. शिंदे साहेबांनी चांगुलपणा दाखवला म्हणून ते खासदारपदी राहिले आहेत”, असेही शंभूराज देसाई म्हणाले.

पवारांच्या नेतृत्वात बेळगावला जाणार? संजय राऊतांनी नेतृत्व बदललं का?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर शिंदे फडणवीस सरकारला षंढ म्हंटले. यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई हे टीका करताना म्हणाले की, “राऊत यांनी वापरलेल्या या शब्दाचा आम्ही तीव्र निषेध करतो. खुद्द संजय राऊत यांनाच बेळगाव कोर्टाचं समन्स होतं. तेव्हा न्यायालयाचं कवच असतानाही संजय राऊत तिथे का गेले नाहीत, मग षंढ कोण?” असा सवाल त्यांनी केला आहे. तर, “आता संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य नाही का?” असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.

खासदार संजय राऊत यांनी, ‘बेळगाव सीमाप्रश्न मार्गी लागला नाही, तर शरद पवार यांच्या नेतृत्वात आम्ही सीमेवर आंदोलन करू’ असे वक्तव्य केले होते. यावर शंभूराज देसाई टीका करताना म्हणले की, “संजय राऊतांना उद्धव ठाकरे यांच्यपेक्षा शरद पवारांचे नेतृत्व मोठे वाटत आहे. आम्ही हीच गोष्ट उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षांपूर्वी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. राऊत हे राष्ट्रवादी पक्षाच्या आहारी गेले आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना संजय राऊत राष्ट्रवादीच्या दावणीला बांधत आहेत. राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी आपले नेतृत्व बदलले आहे का? अशी शंका उपस्थित होते.”

पुढे शंभूराज देसाई म्हणाले की, “षंढ हा शब्द संजय राऊत यांनी हा शब्द वापरला. राऊत स्वतः कोण आहेत? ज्यांना १५ दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारच्या कोर्टाकडून समन्स दिले होते. ते सुद्धा पूर्ण करण्याचे धाडस त्यांच्यात नाही. न्यायालयाचे कवच असतानाही ते कर्नाटकात जायला घाबरले. ते केवढे मोठे षंढ आहेत. उगाच बाह्या वर करून मोठ्याने बोलायचं, ही त्यांची पद्धत कुणीही सहन करणार नाही. त्यांनी अशी वक्तव्ये करणे टाळावे नाहीतर, पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये.” असा इशारा त्यांनी दिला.