तलाक..तलाक..तलाक…! विवाहितेचा छळ करून तीन तलाक देणाऱ्या पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर, ७ डिसेंबर / प्रतिनिधी :-मनासारखा विवाह समारंभ पार न पडल्याने विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला तीन तलाक देणाऱ्या  पतीसह सासरच्या मंडळीविरुध्द वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहरुख सय्यद (पती), मोईन सय्यद (सासरा ) व सुलताना सय्यद (सासू) सर्व रा. रामनगर श्रीरामपूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सुमैय्या हिचा विवाह 2021 मध्ये श्रीरामपूर येथील शाहरुख सय्यद याच्यासोबत पार पडला होता. विवाहानंतर पती व सासरच्यांनी विवाहितेला थोड्यादिवस चांगल्या पद्धतीने नांदविले. परंतु त्यानंतर पती व सासरची मंडळी ममनासारखा विवाह समारंभ पार पाडला नाही असे म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ करू लागले. याप्रकरणी विवाहितेने श्रीरामपूर ठाण्यात सासरच्या मंडळीविरुध्द तक्रार दिली. त्यानंतर ती तालुक्यातील लाडगाव येथे तिच्या माहेरी परतली. या दरम्यान पती शाहरुख याने तिला फोनवर तीन तलाक म्हणून सांगितले. याशिवाय 10 नोव्हेंबर रोजी तो तिच्या माहेरी आला व तिला तीनदा तीन तलाक बोलून निघून गेला. पत्नीला बेकायदेशीररित्या तीन तलाक देणारा पती व या घटनेसाठी त्याला प्रोत्साहन देणारे त्याचे आई-वडील या तिघांविरुद्ध विवाहिता सुमैय्या सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.