महालगाव येथे अख्या कुटुंबाच्या नावावर काढले बोगस कर्ज ; मधुकरराव थावरे नागरी पतसंस्थेच्या चेअरमनसह तिघांविरुद्ध गुन्हा

कै. मधुकराराव थावरे पतसंस्थेतील धक्कादायक प्रकार 

वैजापूर, ७ डिसेंबर / प्रतिनिधी :-कोणतेही कर्ज घेतलेले नसताना तालुक्यातील महालगाव येथील अख्ख्या कुटुंबाने कर्ज घेतल्याचा दावा पतसंस्थेने करून कुटुंबाची झोप उडविली. विशेष म्हणजे या प्रकरणात बोगस जामीनदारापासून ते बोगस संमतीपत्र, त्यांच्याच नावावर बोगस मुद्रांक खरेदी व बोगस करारनामा अशा सर्वच क्लृप्त्या वापरल्या गेल्या. बोगस स्वाक्ष-यांच्या माध्यमातून बनावट दस्तावेज तयार करून बोगस कर्जवसुली दावा केल्याप्रकरणी तालुक्यातील महालगाव येथील कै. मधुकरराव थावरे नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनसह व्हाईस चेअरमन व व्यवस्थापकाविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे पतसंस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. 

निशिकांत थावरे (चेअरमन), मच्छिंद्र शेळके (व्हाईस चेअरमन) व चंद्रकांत झिंजुर्डे (व्यवस्थापक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील महालगाव येथील पंचायत समितीचे माजी सदस्य तथा माजी सरपंच भाऊसाहेब झिंझुर्डे, पत्नी मंदाबाई झिंजुर्डे, जयराम झिंजुर्डे (भाऊ) नंदाबाई झिंजुर्डे (भावजयी), भारती झिंजुर्डे (मुलगी) व गंगाधर साळुंके (जावई) हे सर्वजण गावतीलच कै. मधुकराराव थावरे नागरी सहकारी पतसंस्था (मर्यादित ) या पतसंस्थेचे सदस्य आहेत. 2019 मध्ये औरंगाबाद येथील सहकार न्यायालयात या पतसंस्थेने कुटुंबावर कर्जवसुलीचा दावा दाखल केल्याचे भाऊसाहेब झिंजुर्डे यांना समजले. परंतु संबंधीत पतसंस्थेकडून आपण कोणतेही कर्ज घेतले नसल्याने  प्रकरणात काही तरी काळेबेरे असल्याचे त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी पतसंस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्यासह व कुटुंबियांच्या नावे दाखविलेल्या कर्जाबाबत विचारणा केली. परंतु पतसंस्थेकडून त्यांना योग्य माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी वैजापूर येथील सहाय्यक निबंधकांकडे  अर्ज करून कागदपत्रांची  मागणी केली. अखेर ऑगस्ट महिन्यात  पतसंस्थेने त्यांना कर्जाची कागदपत्रे दिली. या कागदपत्रांवर बोगस सह्या करून बनावट दस्त जोडले असल्याचे भाऊसाहेब झिंजुर्डे यांना निदर्शनास आले. पतसंस्थेने त्यांच्या शेतजमीनीवर बोजा टाकण्यासाठी तलाठ्यास  पत्र दिले होते. परंतु झिंजुर्डे यांनी तलाठी कार्यालयास पत्र देवून हा  बोजा रोखला. याप्रकरणी भाऊसाहेब झिंजुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेचे चेअरमन निशिकांत थावरे, व्हाईस चेअरमन मच्छिंद्र शेळके व  व्यवस्थापक चंद्रकांत झिंजुर्डे या तिघांविरुध्द वीरगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल

दरम्यान कोणतीही बँक अथवा पतसंस्थेकडून कर्ज घ्यायचे असेल तर तशी मागणी संबंधित वित्तीय संस्थेकडे करावी लागते.  विशेष म्हणजे झिंजुर्डे यांनी कोणत्याही कर्जाची मागणी केली नव्हती. कर्ज मजुरीसाठी स्वतंत्र जामीनदार असणे आवश्यक आहे. झिंजुर्डे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना घेतलेल्या कर्जास आलटून पालटून बोगस जामीनदार दाखविण्यात आलेले आहे. त्यांचेही बोगस दस्तावेज दाखविण्यात आले. त्यापुढचा कहर म्हणजे मुद्रांक देखील त्यांच्याच नावाने घेऊन बोगस स्वाक्ष-या करण्यात येऊन संमतीपत्र व करारनामा देखील बोगस करण्यात आले. कर्जवसुलीचा दावा केल्यानंतर झिंजुर्डे यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर ते कर्जाचा तपशील विचारण्यासाठी पतसंस्थेत गेले तेव्हा संबधितांनी त्यांना पिटाळून लावले. याबाबत झिंजुर्डे यांनी वैजापूर येथील न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. दरम्यान संबधित मुद्रांक हे वैजापूर उपकोषागार कार्यालयातून निर्गमित झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे हा मुद्रांक विक्रेता नेमका कोण ? याचीही चौकशी झाल्यास बरेचसे काही बाहेर येऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेनेही तपास करणे आवश्यक आहे. योगेश थावरे चालवित असलेल्या कै.अशोकराव गलांडे इंश्लिश शाळेला अवैधरित्या 25 लाख रुपये दान करण्यात आल्याचे पोलिस ठाण्यात दिलेल्या  फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

इंग्रजी शाळेला 25 लाख दान

दरम्यान पतसंस्थेचे चेअरमन निशिकांत थावरे व त्यांचा पुतण्या अभय थावरे या दोघांनी योगेश निशिकांत थावरे याच्या नावावर असलेल्या एक एकर जमिनीवर 87 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून योगेश थावरे चालवित असलेल्या कै.अशोकराव गलांडे इंग्रजी शाळेला अवैधरित्या 25 लाख रुपये दान करण्यात आले असून याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पोलिस ठाण्यात दिलेल्या  फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.