रोजगार हमी योजनेची मंजूर कामे डिसेंबर अखेर सुरु करा – पालकमंत्री संदिपान भुमरे

औरंगाबाद, ​५​ डिसेंबर  / प्रतिनिधी :-रोजगार हमी योजनेतील मंजूर कामे डिसेंबर अखेर सुरु करुन विभागाने दिलेला इष्टांक प्रत्येक जिल्ह्यांनी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज विभागीय आढावा बैठकीत दिले. आठही जिल्ह्यातील रोहयोचे उपजिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हा‍धिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत रोजगार हमी योजना विभागाचे सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, उपायुक्त रोहयो समिक्षा चंद्राकार, व गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.

मातोश्री पाणंद रस्त्याची कामे पूर्ण करुन ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शेती साठी रस्ता उपलब्ध करुन द्यावा. विशेषत: जालना जिल्ह्यतील अबंड व घनसावंगी या तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतरस्त्यासाठी वारंवार मागणी केलेली असून ही मागणी पूर्ण करण्यासाठी गटविकास अधिकारी उपजिल्हाधिकारी यांनी कालबद्ध कार्यक्रम आखून शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करुन द्यावेत. अन्यथा डिसेंबर नंतर कारवाई करण्याचे  निर्देश रोहयो मंत्री यांनी दिले.

या बैठकीत औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली व नांदेड या जिल्ह्याने शासनाने दिलेला रोहयोच्या योजनेतील कुशल व अकुशल कामांचा निधी खर्च करुन तात्काळ उर्वरित कामे पूर्ण करावेत. यामध्ये सामूहिक, वैयक्तिक विहीर, शोष खड्डे, पानंद रस्ते, वृक्ष लागवड, घरकूल बांधणी या कामाचा संबंधित अधिकाऱ्याकडून जिल्ह्यातील तालुकानिहाय आढावा घेतला.

सचिव नंदकुमार यांनी शेतकऱ्यांना व गरीब दुर्बलांना यातून बाहेर काढण्यासाठी व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी रोजगार हमी योजना राज्यात राबविले जात असून यामध्ये उपजिविकेसोबत शिक्षण, आरोग्य, राहणीमान व आर्थिक प्रगती यासाठी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेने प्रमाणिक पणे पार करावी. रोहयोच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर डिसेंबर नंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे नंदकुमार यांनी सांगितले.