…तर मंत्रिपद गेले खड्यात; शिंदे गटाच्या नेत्याने दिला इशारा! गुलाबराव पाटलांकडून घरचा आहेर!

मुंबई ,४ डिसेंबर  / प्रतिनिधी :-राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून वाद शांत होत नाही. तोच, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीदेखील ‘महाराजांचा जन्म हा कोकणात झाला’ असे अजब वक्तव्य केलं. यानंतर आता शिंदे गटातील मंत्री आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील त्यांच्यावर टीका केली आहे.अशातच आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी शिंदे-भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे.

माध्यमांसमोर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा कुण्या ‘मायच्या लाल’ला अधिकार नाही. महाराजांबद्दल कोणीही वाकडे तिकडे बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ करणार नाही. शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाहीत. पुन्हा जर अवमान केला तर मंत्रीपद गेल खड्ड्यात त्यांना सोडणार नाही,” असा इशाराच त्यांनी दिला आहे.

दरम्यान भाजप नेते प्रसाद लाड यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करताना म्हणाले की, “छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. विश्वाचे आराध्य दैवत शिवरायांचा सन्मान आम्ही यापुढेही ठेवणार.”