आता रावसाहेब दानवेंकडून शिवाजी महाराजांचा अपमान? :पुन्हा भाजपच्या नेत्याने केले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अजब वक्तव्य

मुंबई ,४ डिसेंबर  / प्रतिनिधी :-राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, त्यानंतर काही भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली. यावरून विरोधकांनी टीका करत भाजप विरोधात निर्दर्शने केली. यावर वाद सुरु असतानाच आता पुन्हा एकदा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अजब वक्तव्य केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला.” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केल्यानंतर विरोधकांकडून चांगलीच टीका होते आहे. ‘दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील आज छत्रपती शिवाजी महाराज  यांचा जन्म कोकणात झाल्याचे म्हणत या वादात भर घातली. यानंतर भाजपाचे आणखी एक नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. यावरून पुन्हा एकदा वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण : प्रसाद लाड

“छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. विश्वाचे आराध्य दैवत शिवरायांचा सन्मान आम्ही यापुढेही ठेवणार! कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.” असे स्पष्टीकरण भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिले.

मुंबईतील कोकण महोत्सवामध्ये प्रसाद लाड म्हणाले की, “हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचे बालपण गेले आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, “सर्वांनाच माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आहे ते. त्यामुळे त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.” त्यामुळे आता प्रसाद लाड यांच्या वक्तव्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिवरायांचा एकेरी उल्लेख  

रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यनंतर दानवे यांच्याविरोधात शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. रावसाहेब दानवे यांच्याविरोधात आंदोलनाला देखील सुरुवात झाली आहे. शिवप्रेमी नागरिकांकडून दानवेंचा निषेध करण्यात येत आहे.