युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई ,​४​ डिसेंबर  / प्रतिनिधी :-पूर्वी उद्योगांना परवानग्यांसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागे. परंतू आज व्यापार सुलभीकरणामुळे उद्योग व्यवसाय करणे सोपे झाले आहे. देशात तसेच राज्यात अनेक स्टार्टअप व युनिकॉर्न कंपन्या निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तेजीने होत असलेली प्रगती पाहता, देशातील युवा उद्योजक भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवतील, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद येथील मुक्त पत्रकार व प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित ‘मूव्हिंग ऍस्पिरेशन्स’ – नेक्स्टजेन च्या 25 परिणामकारक कथा’ या मराठी व इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायात उतरलेल्या दुसऱ्या पिढीतील 25 युवा उद्योजकांच्या व्यवसाय यशोगाथा देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायांमध्ये दुसऱ्या पिढीतील युवक युवती नवनव्या संकल्पना घेऊन आले आहेत. हे युवक युवती उच्च विद्याविभूषित असून त्यांना जागतिक व्यापार प्रवाहांची माहिती आहे. या युवा उद्योजकांच्या यशोगाथा वाचून शंभरपैकी दहा युवकांनी प्रेरणा घेतली तरी त्याचा त्यांना व राज्याला फायदा होईल असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्राला गरवारे, जैन, किर्लोस्कर अशा अनेक औद्योगिक घराण्यांची परंपरा आहे. या कौटुंबिक उद्योगांमधील पुढची पिढी त्यांचे व्यवसाय जोमाने पुढे नेत आहेत. आज डिजिटल क्षेत्र तसेच हरित ऊर्जा क्षेत्रात देश दैदिप्यमान प्रगती करीत आहे. त्यामुळे आगामी  काळात देशाची अर्थव्यवस्था केवळ 5 ट्रिलियन डॉलर इतकीच नाही 10 ट्रिलियन डॉलर देखील होऊ शकते असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. राज्यातील दुसऱ्या पिढीतील व्यवसाय – उद्योगातील युवा उद्योजकांना शोधून पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी लेखक दत्ता जोशी यांचे अभिनंदन केले.‘मूव्हिंग ऍस्पिरेशन्स’ या पुस्तकामध्ये जैन इरिगेशन समूहातील 25 उद्योजकांच्या यशोगाथा देण्यात आल्या आहेत.

प्रकाशन सोहळ्याला प्रसिद्ध उद्दोजक राम भोगले ,सातारा येथील कवित्सु रोबोट्रॉनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ फडतरे, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ तसेच युवा उद्योजक उपस्थित होते.