नांदेड देगलूर बिदर रेल्वे मार्गासाठी मंत्रिमंडळ बैठकीसमोर प्रस्ताव येणार!

खा. चिखलीकर यांच्या मागणीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

नांदेड ,२ डिसेंबर / प्रतिनिधी :-रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या नांदेड देगलूर बिदर रेल्वेमार्गाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 50 टक्के वाटा उचलण्याची मागणी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. खा. चिखलीकर यांच्या या मागणीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली असून आगामी मंत्रिमंडळ बैठकीसमोर हा प्रस्ताव ठेवावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे खा. चिखलीकर यांनी सांगितले.

गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून नांदेड देगलूर बिदर या रेल्वेमार्गाची मागणी होती. परंतु आधीच्या लोकप्रतिनिधींकडून त्याची पूर्तता होऊ शकली नाही. प्रतापराव पाटील चिखलीकर हे नांदेडचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी पहिल्याच अधिवेशनात या रेल्वे मार्गाची मागणी मंजूर करण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे आग्रह धरला. ना. पियुष गोयल यांनी 22 सप्टेंबर 2019 च्या आदेशानुसार नांदेड देगलूर बिदर रेल्वे मार्गासाठी तब्बल 2152 कोटी रुपयांची तरतूद रेल्वे विभागाच्या पिंकबुकमध्ये केली. त्यानंतर 2020 साली या रेल्वेमार्गाचा फायनल लोकेशन सर्वे झाला. 2021 च्या अर्थसंकल्पात या रेल्वेमार्गासाठी सुधारित 2565 कोटी रुपयांची तरतूद पिंकबुकमध्ये करण्यात आली. परंतु कोविड 19 महामारीमुळे या कामाला ब्रेक लागला. मागील दोन वर्षात पिंकबुकमध्ये नाममात्र तरतूद करून हा प्रस्ताव रेल्वे  मंत्रालयाने सक्रिय ठेवला होता.

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातून हा रेल्वेमार्ग जात असल्याने आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभारणीसाठी केंद्र शासनाने 50 टक्के वाटा उचलण्याचे जाहीर केले. तसेच महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांनी त्यांच्या भागातून जाणाऱ्या रेल्वे मार्गासाठी 50 टक्के वाटा उचलणे आवश्यक असल्याचे लोकसभेतील चर्चेद्वारे उत्तर देण्यात आले होते. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला 50% वाटा उचलणेबाबत पत्रही दिले होते. परंतु मागच्या महाविकास आघाडी सरकारने या रेल्वे मार्गासाठी 50 टक्के वाटा उचलण्यास सकारात्मक भूमिका घेतली नाही. त्यामुळे निर्णय प्रलंबित राहिला.

राज्यात भारतीय जनता पक्ष व बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यानंतर या रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गुरुवारी (दि.1) मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारने या रेल्वेमार्गासाठी सकारात्मक भूमिका घेतली नाही. त्यामुळे रेल्वे मार्गाच्या कामासाठी विलंब होत असल्याचे खा. चिखलीकर यांनी दोन्ही नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले.

हा रेल्वेमार्ग केवळ महाराष्ट्र व कर्नाटकच नव्हे तर देशाला मध्यभागातून जोडल्यामुळे अनेक ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेचे अंतर कमी होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांना या रेल्वे मार्गामुळे देशात कोठेही थेट रेल्वेने जाता येऊ शकणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या भागातून जाणाऱ्या प्रकल्पाकरिता 50 टक्के वाटा उचलावा, अशी आग्रही मागणी खा. चिखलीकर यांनी केली. खा. चिखलीकर यांच्या या मागणीला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही अनुकूलता दर्शविली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना तर उपमुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाच्या सचिवांना हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर या रेल्वे मार्गाच्या कामाला गती येणार असून कर्नाटकप्रमाणेच नांदेडच्या भागातूनही प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा खा. चिखलीकर यांनी व्यक्त केली.